Crop damage assessment reports : दिवाळीपूर्वी मदतीची प्रतीक्षा ! पीक पंचनामे अंतिम टप्प्यात file photo
जालना

Crop damage assessment reports : दिवाळीपूर्वी मदतीची प्रतीक्षा ! पीक पंचनामे अंतिम टप्प्यात

जिल्ह्यात पीक नुकसानीचे ७४ टक्के पंचनामे पूर्ण; १५ ऑक्टोबरची डेडलाइन

पुढारी वृत्तसेवा

Awaiting aid before Diwali! Crop damage assessments in the final stage

जालना, पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगामात पावसाच्या दीर्घ खंडामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाची धावपळ सुरू आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत ई-पंचनामा प्रक्रिया राबविण्यात येत असून, ९ ऑक्टोबरअखेर सुमारे ७४ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे पूर्ण करून अंतिम अहवाल सादर करण्यासाठी प्रशासनाने १५ ऑक्टोबरची मुदत निश्चित केली आहे. मात्र, प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार, याबाबत अद्याप निश्चित तारीख स्पष्ट झालेली नाही.

खरीप हंगामात पावसाने दिलेल्या खंडामुळे अनेक भागांतील पिकांचे नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी जिल्ह्यात ई-पंच-२ प्रणालीअंतर्गत पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील ५ लाख ८९ हजार १२८ खातेदारांपैकी ४ लाख २९ हजार ७५७शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे उर्वरित पंचनामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

जिल्ह्यातील ५४५ बाधित गावांमध्ये ६ लाख ७६ हजार ९९१ हेक्टर क्षेत्र बाधित नोंदविण्यात आले आहे. यापैकी पंचनाम्यांची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण होत असून, नुकसानग्रस्त क्षेत्राची अचूक नोंद घेण्यावर भर दिला जात आहे. केंद्रीय पथकाकडूनही बदनापूर, अंबड, जालना, घनसावंगी आदी तालुक्यांतील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यात आली. दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा असल्याने पंचनाम्यांच्या कामाला वेग देण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत.

पंचनामे पूर्ण झाल्यानंतरही शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळेलच, असे नाही. नुकसानाच्या आकडेवारीची पडताळणी, शासनाची मंजुरी, निधीची तरतूद आणि प्रत्यक्ष अनुदान वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच मदत खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी मदत मिळण्याची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष आता अंतिम अहवाल आणि शासनाच्या निर्णयाकडे लागले आहे.

प्रशासनाने १५ ऑक्टोबरपर्यंत पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची निश्चित तारीख जाहीर झालेली नसल्याने त्यांच्या प्रतीक्षेचा कालावधी किती वाढणार, हा प्रश्न कायम आहे-

दुष्काळी परिस्थितीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आंतरमंत्रालयीन पथकाने जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील नाणेगाव तसेच अंबड तालुक्यातील किणगाववाडी आणि जामखेड परिसरातील शेतपिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पीक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. संभाव्य पीक नुकसान आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणी यांची प्रत्यक्ष शेतावर जाऊन माहिती घेत वस्तुस्थिती जाणून घेतली.

कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील या केंद्रीय पथकात महालनोबिस राष्ट्रीय पीक पूर्वानुमान केंद्राचे उपसंचालक सुनील कुमार दुबे, नीती आयोगाचे सल्लागार डॉ. जसपाल सिंग आणि पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या पशुधन अधिकारी डॉ. साक्षी भदौरिया यांचा समावेश होता.

चारा छावण्यांच्या हालचाली

जिल्ह्यात पावसाने दडी दिल्याने शेतकऱ्यांसमोर गुरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. चारा टंचाईमुळे जनावरांची उपासमार होण्याची भीती आहे. प्रशासनाने चारा छावण्या सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, पण ग्रामपंचायत स्तरावर शासनाचा निर्णय प्रलंबित आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT