Attack at Mohalai Chowfuli Stemming from an Old Land Plotting Dispute; Case Registered Against Six Individuals
पिंपळगाव रेणुकाई/पारध, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील मोहळाई चौफुली परिसरात जुन्या प्लॉटिंगच्या वादातून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सहाजणांविरुद्ध पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात ज्ञानेश्वर आनंदा वाघ (३५, रा. मोहळाई ता. भोकरदन) यांनी फिर्याद दिली. त्यात त्यांनी शुक्रवार, दि. २२ मे रोजी पहाटे एक वाजेच्या सुमारास रेलगाव, कोसगाव, अवघडराव सावंगी आणि मोहळाई चौफुली परिसरात ते आपल्या स्विफ्ट कारने जात असताना आरोपींनी त्यांची कार अडवली.
आरोपी रवि रजनी वाघ याने फिर्यादीच्या केसांना धरून खाली ओढत हातातील फायटरने डाव्या भुवईवर वार केल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला. तसेच इतर आरोपींनी फिर्यादीची आई, पत्नी, पुतण्या व त्याच्या पत्नीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी रवि रजनी वाघ, योगेश भगवान पगारे, संदीप श्रीराम वाघ, अभिषेक दिलीप वाघ, रजनी दौलत वाघ आणि श्रीराम दौलत वाघ (सर्व रा. संभाजीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ पी. एन. सिनकर करीत आहेत.
३५ लाखांचा मुद्देमाल जप्त
दरम्यान, पारध पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीवरही कारवाई करत सुमारे ३५ लाख रुपये किमतीचा हायवा आणि पाच ब्रास वाळू जप्त केली आहे. या प्रकरणी दादाराव भाउसाहेब साबळे (रा. लिंगेवाडी ता. भोकरदन) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.