आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथील महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलांचा जोरदार शॉक दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.नियमितपणे दर महिन्याला वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांनाही या महिन्यात अवाच्या सव्वा बिले आल्याने सर्वसामान्य वीज ग्राहकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. ही बिले नेमकी कशाच्या आधारावर वाढवून देण्यात आली, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
आष्टी गावात अंदाजे चार हजारांहून अधिक वीज ग्राहक असून, त्यापैकी अनेक ग्राहक नियमितपणे महावितरणचे वीज बिल भरतात. मात्र, यंदा आलेल्या बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. महिन्याला ठरावीक रकमेचे बिल येत असताना अचानक भरमसाठ रक्कम आकारण्यात आल्याने अनेक ग्राहक महावितरण कार्यालयात धाव घेत आहेत.
या संपूर्ण प्रकारात विशेष बाब म्हणजे ज्या वीज ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसविण्यास नकार दिला आहे, त्यांनाच वाढीव वीज बिलांचा फटका बसत असल्याचा आरोप काही ग्राहकांकडून केला जात आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर बसविण्यास नकार दिल्यामुळेच अशी वाढीव बिले आली आहेत का, असा संशय नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.
मात्र, याबाबत महावितरणने अधिकृत खुलासा केलेला नसल्याने या आरोपांची सत्यता तपासणे आवश्यक आहे. स्मार्ट मीटर न बसविणाऱ्या ग्राहकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
एकीकडे महावितरणकडून वीज बिल वेळेत भरण्याचे आवाहन केले जाते, तर दुसरीकडे नियमितपणे बिल भरणाऱ्या ग्राहकांनाच अवाजवी बिलांचा भुर्दंड सहन करावा लागत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. काही ग्राहकांनी तर संताप व्यक्त करत, आम्ही नियमितपणे वीज बिल भरूनही आमच्यावर आर्थिक भार टाकला जात असेल, तर काहीजण थेट आकडे टाकून वीज वापरत असल्याचे दिसते, मग आम्हीही तसेच करायचे का, असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
वाढीव बिलांच्या संदर्भात महावितरणचे सहाय्यक अभियंता अनिकेत महाजन यांच्याशी विचारणा केली असता, अनेक ग्राहकांना वाढीव बिले आल्याचे त्यांनी मान्य केले. वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी
महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आष्टी येथील वीज ग्राहकांच्या वाढीव बिलांची तातडीने वेळेवर वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांनाच जर वाढीव बिलांचा फटका बसत असेल, तर महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे. वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेण्याची मागणी वीज ग्राहकांनी केली आहे.