जिंतूर : परभणी पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत, नुकताच विशेष सन्मान सोहळा पार पडला. यामध्ये जिंतूर महामार्ग सुरक्षा पथकाच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (सफौ.) आशा शिवाजीराव शेल्हाळे यांना त्यांच्या १५ वर्षांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह' देऊन गौरविण्यात आले. परभणीचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आशा शेल्हाळे यांनी आपल्या १५ वर्षांच्या कार्यकाळात विविध गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा यशस्वी तपास करून त्यांचा उलगडा केला आहे. त्यांच्या याच सातत्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण कामगिरीची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आहे. या गौरव सोहळ्यात परभणी जिल्ह्यातील एकूण तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता, ज्यात शेल्हाळे यांनी जिंतूर विभागाचे नाव उज्ज्वल केले आहे.
या यशामुळे आशा शेल्हाळे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल जिंतूर महामार्ग पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक: विनायक जाधव, पोलीस निरीक्षक: गजेंद्र सरवदे आणि पीएसआय: प्रकाश नेवल यांच्यासह इरफानोद्दीन इनामदार, प्रताप सरनाईक, नितराज नेताम, मदन मेटके, सय्यद शाकीर, अतुल कांदे, अमोल शेंडगे, व्यंकटेश नरवडे, वाल्मिक चव्हाण, सूर्यकांत हाके आणि महेश केदारी या सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.