Arbitrary functioning of the Aadhaar Seva Kendra
सुखापुरी, पुढारी वृत्तसेवा : आधार सेवा केंद्रात सर्वसामान्य नागरिकांकडून आधार कार्डसंबंधित विविध सेवांसाठी शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे आधार सेवा केंद्राच्या कारभाराबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत असून, संबंधित यंत्रणेने या प्रकाराची तातडीने दखल घेण्याची मागणी होत आहे.
आधार कार्ड हे प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचे शासकीय ओळखपत्र आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाला आधार नोंदणी, बायोमेट्रिक अपडेट, मोबाईल क्रमांक लिंक करणे तसेच नाव, पत्ता व जन्मतारखेसह विविध दुरुस्त्यांसाठी आधार केंद्रात जावे लागते. संबंधित आधार सेवा केंद्रात या सेवांसाठी नेमके किती शुल्क आकारले जाते, याची माहिती देणारे अधिकृत दरपत्रक लावण्यात आलेले नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
विशेष म्हणजे, लहान मुलांच्या आधार नोंदणी व वयोमानानुसार करावयाच्या बायोमेट्रिक अपडेटसाठीही नागरिकांकडून पैसे घेतले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. नियमानुसार ज्या सेवांसाठी शुल्क आकारण्याची तरतूद नाही, त्यासाठी पैसे घेतले जात असल्यास हा प्रकार गंभीर असून त्याची चौकशी होणे आवश्यक आहे. अनेक सामान्य नागरिकांना आधार सेवांचे अधिकृत शुल्क किती आहे, याची माहिती नसल्यामुळे त्यांच्याकडून मागितलेली रक्कम देण्याशिवाय पर्याय राहत नाही.
आधार सेवा केंद्र हे नागरिकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आले आहे की नागरिकांकडून मनमानी पद्धतीने पैसे वसूल करण्यासाठी, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. संबंधित केंद्र चालकाकडून शासनाच्या नियमांचे पालन केले जात आहे का? अधिकृत दरपत्रक का लावण्यात आलेले नाही? नागरिकांना प्रत्येक व्यवहाराची पावती दिली जाते का? तसेच निर्धारित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारली जात आहे का? या सर्व बाबींची तपासणी होणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासन, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) तसेच संबंधित आधार विभागाच्या अधिकाऱ्यांनी या केंद्राची प्रत्यक्ष तपासणी करून शुल्क आकारणीची पडताळणी करावी.
खात्री करावी
आधारसारख्या अत्यावश्यक सेवेसाठी नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू नये. प्रशासनाने केवळ सूचना देऊन थांबू नये, तर प्रत्यक्ष तपासणी करून नागरिकांना पारदर्शक, सुलभ आणि नियमानुसार सेवा मिळेल याची खात्री करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.