Apply for crop loans and Kisan Credit Cards - District Collector
जालना, पुढारी वृत्तसेवाः जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज, किसान क्रेडिट कार्ड तातडीने व सुलभ पध्द तीने उपलब्ध व्हावे तसेच त्यांना बँकेत वारंवार चकरा माराव्या लागू नयेत यासाठी 'जनसमर्थ' पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जालना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी जनसमर्थ पोर्टलवर नोंदणी करून पीककर्ज व किसान क्रेडीट कार्डसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी स्वत: अथवा सेतू, महाईसेवा, सीएससी केंद्राच्या सहाय्याने 'जनसमर्थ' पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करावा. आवश्यक माहिती, कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी झाल्यानंतर अर्ज संबंधित बँकेकडे ऑनलाईन पध्दतीने पाठविण्यात येईल आणि बँकेकडून नियमानुसार तत्काळ कारवाई होईल अशा सूचनाही जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्हा अग्रणी बँक, सर्व राष्ट्रीयीकृत, अनुसूचित बँकांचे शाखा व्यवस्थापक व नोडल अधिकारी यांना पत्राद्वारे दिल्या आहेत.
प्रत्येक बँक शाखेने जनसमर्थ अर्जासाठी नोडल अधिकारी नियुक्त करून अर्ज प्राप्त होताच तत्काळ पडताळणीची प्रक्रिया करावी. पात्र प्रकरणांना प्राधान्य देवून किमान कालावधीत शक्य असल्यास त्याच दिवशी निर्णय देण्याचा प्रत्यन करावा. प्राथमिक पडताळणीनंतरच अर्ज पुढे पाठविण्यात येत असल्याने एकाच कागदपत्रासाठी वारंवार हरकती टाळाव्यात.
अर्जात त्रुटी असल्यास नेमकी त्रुटी स्पष्टपणे प्रणालीद्वारे कळवावी. जिल्ह्यातील सेतू, महा ई सेवा, सीएससी केंद्राने शेतकऱ्यांना नोंदणी, अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड, अर्जस्थिती तपासणे आदी बाबींमध्ये मदत करावी. तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांनी जिल्हा अग्रणी बँकेच्या समन्वयाने तालुकानिहाय मोहिमेचे वेळा-पत्रक तयार करून प्रसिध्द करावे, जनसमर्थ पोर्टलची ग्रामपंचायत, कृषी कार्यालय, बँक शाखामार्फत व्यापक जनजागृती करण्यात यावी.
अंमलबजावणीत अडचण असल्यास तत्काळ जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक व संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा. प्रत्येक आठवड्याला प्राप्त अर्ज, प्रक्रिया अर्ज, मंजूर अर्ज, प्रलंबित प्रकरणे कारणासह प्रगती अहवाल सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या आहेत.
कागदपत्रे गरजेचे
पीककर्ज व किसान क्रेडिट कार्ड लाभासाठी शेतकऱ्यांजवळ शेतकरी आयडी, आधार व आधार लिंक मोबाईल क्रमांक, बैंक खाते तपशील, पासबुक, किसान क्रेडिट कार्ड व पीककर्ज नियमानुसार जमीन व पीक तपशील, पॅनकार्ड तसेच बँकेने आवश्यक ठरविलेले इतर दस्तऐवज आदी कागदपत्रे असणे गरजेचे आहे.