आन्वा : सादिक शेख
भोकरदन तालुक्यासह आन्वा परिसरात खरीप हंगामातील पिकांचे नुकसान, पावसाची अनिश्चितता आणि वाढत्या उत्पादनाचा खर्चामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आता 'नमो शेतकरी महासन्मान निधी'च्या रखडलेल्या हप्त्यांकडे लागले आहे.
या योजनेचे नववा आणि दहावा हप्ता अद्याप जमा झाला नसल्याने शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजारप्रमाणे एकूण चार हजार रुपयांच्या मदतीची प्रतीक्षा आहे. राज्य सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अग्रीम मदत म्हणून पाच हजार रुपये देण्याची घोषणा केली असली, तरी नियमित आर्थिक आधार ठरणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधीचे दोन हजार नमोचे हप्ते रखडल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.
खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून, काही भागात किडींच्या प्रादुर्भावामुळेही शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहेत. अशा परिस्थितीत शेतीचा खर्च व कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि आगामी रब्बी हंगामाची तयारी यासाठी पैशांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.
शेतकऱ्यांना रखडलेल्या हप्त्यांबाबत स्पष्ट माहिती मिळावी आणि आर्थिक मदत लवकर उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा आहे. आधीच कमी पाऊस आणि पिकांच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत मिळाल्यास रब्बी हंगामाच्या तयारीसाठी दिलासा मिळू शकतो. त्यामुळे संबंधित यंत्रणेने हप्त्यांच्या सद्यस्थितीबाबत स्पष्टता द्यावी आणि पात्र लाभार्थ्यांना नियमानुसार आर्थिक मदत वेळेत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
केंद्राच्या प्रधानमंत्री दोन किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने जून २०२३ मध्यं नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेतून पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. मात्र दोन हप्ते रखडल्याने अपेक्षित आर्थिक आधार मिळालेला नाही.
दिवाळी जवळ आली असताना खरीप हंगामातील पिकांचे नुकसान, पावसाची अनिश्चितता व शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज अधिक तीव्रतेने जाणवत आहे. अग्रीम मदतीच्या घोषणेसोबतच नमो शेतकरी महासन्मान निधीचे प्रलंबित चार हजार रुपयेही तातडीने शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावेत, अशी मागणी होत आहे. या आर्थिक संकटाच्या काळात केवळ घोषणांपेक्षा प्रत्यक्ष मदत खात्यात जमा होणे महत्वाचे असल्याची भावना आता शेतकऱ्यांकडून होत आहे.