अंबड : मारहाण प्रकरणातील आरोपीच्या घरातून सापडलेले तलवार, गुप्ती, कुऱ्हाड. pudhari photo
जालना

Jalna Crime : मारहाण प्रकरणातील आरोपीच्या घरातून सापडले तलवार, गुप्ती

पोलिस ठाणे, डीवायएसपी व न्यायालय यांना लागूनच राहतात आरोपी

पुढारी वृत्तसेवा

अंबड : शहरात मारहाण, धमकी आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या व्यक्तींच्या घराची झडती घेतली असता बेकायदेशीर धारदार शस्त्रांचा साठा आढळून आला. पोलिसांनी तलवारी, कट्यार, कुऱ्हाडींसह आठ धारदार शस्त्रे जप्त केली असून, याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शहरात बबलू भुंजगा पवार, गुन्या भुंजगा पवार, विनोद भुंजगा पवार व कुणाल पवार यांच्याविरुद्ध मारहाण, धमकी व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शनिवारी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून हे सर्व आरोपी फरार आहेत. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींच्या घराची झडती घेतली असता घराबाहेर लिंबाच्या झाडाखाली लोखंडी पेटीत बेकायदेशीररीत्या धारदार शस्त्रे ठेवलेली आढळली.

पोलिसांनी घटनास्थळावरून दोन तलवारी, कुकरिसारखे हत्यार, कुऱ्हाड, कट्यार, लोखंडी दांड्याची धारदार कुऱ्हाड, साखळीदार गदा आणि दांड्याविना कुऱ्हाड अशी एकूण आठ शस्त्रे जप्त केली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ४ व २५ अन्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोनि संतोष घेडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि बी.बी.नारोडे, हवालदार दीपक चव्हाण, यशवंत मुंडे, महिला पोलीस अलका केंद्रे, अरुण मुंडे आणि तुकाराम मदन यांनी केली.

आरोपीच्या घरासमोर शाससकीय कार्यालय

अंबड न्यायालयाच्या अगदी समोर आरोपीचे पत्र्याच्या शेडमध्ये घर आहे. शिवाय लागूनच अंबड उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय आणि याच कार्यालयासमोर आता अंबड पोलिस स्टेशन आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या तिन्ही कार्यालयांसमोर आरोपी राहतात शिवाय येथेच एक शाळा, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय असे शासकीय महत्त्वाचे ठिकाणे आहेत. आणि या सर्वांच्या नाकावर टिच्चून आरोपी याच ठिकाणाहून नेहमीचे आपले गुंडगिरीचे धंदे करतात. धारदार शस्त्रांसह गावठी कट्टे सुद्धा बाळगतात हे विशेष. यामुळे पोलिस यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT