अंबड : व्यावसायिक ग्राहकाकडे सहा महिन्यापासून थकलेल्या वीजबिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकास वीजग्राहकाच्या भाच्याने धमकावून शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने पथकातील महिला अभियंत्याचा मोबाईल हिसकावून घेत जमिनीवर आपटला. या प्रकरणी आरोपीवर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हस्तपोखरी येथील वीजग्राहक दत्ता चोरमले यांच्याकडे वीजबिलाची सहा महिन्यांची २४ हजार ६९० रुपये थकबाकी होती. महावितरणकडून वीज भरण्यासाठी त्यांना वेळोवेळी सूचना देण्यात आल्या होत्या परंतु त्यांना पोल्ट्री फॉर्मला वापरलेल्या वीजबिलाची थकबाकी भरली नाही. त्यामुळे ९ सप्टेंबर रोजी महावितरणच्या जामखेड शाखेचे सहायक अभियंता योगेश देवडे, सहायक अभियंता शिल्पा जोशी, वरिष्ठ तंत्रज्ञ गणेश गाडेकर , एम.व्ही. विसपुते हे चोरमलेंचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेले होते.
हस्तपोखरी येथे दुपारी ३ वाजता दत्ता चोरमले यांचे हस्तपोखरी शिवारातील गट क्र.४२ मधील शेतात असलेल्या पोल्ट्री फॉर्मवर एक इसम हजर होता. त्याने सांगीतले कि, दत्ता चोरमले हे बाहेरगावी गेलेले असून मी त्याचा भाचा ओमकार पालेकर आहे. वीजपुरवठा बंद करण्याबाबत सांगितल्यावर ओमकार पालेकरने महावितरणच्या पथकास धमकावल्याचा आरोप आहे.
'तुम्ही आताच्या आता बाहेर जा. नाहीतर तुम्हाला मी लोखंडी रॉडने मारहाण करेल,' अशी धमकी त्याने दिली. अभियंता व कर्मचारी त्याला समजावून सांगत असताना पालेकरने त्यांना शिवीगाळ केली. सहायक अभियंता शिल्पा जोशी या त्यांच्या मोबाईलमध्ये या प्रकाराचा व्हिडिओ रेकॉर्ड करीत असताना ओमकार पालेकरने मोबाईल हिसकावला आणि त्यामध्ये केलेले व्हीडिओ रेकॉर्डिंग व इतर काही महत्त्वाचे फोटो व व्हीडिओ डिलीट करून मोबाईल जमिनीवर फेकून दिला. यात मोबाईलचे मोठे नुकसान झाले.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अंबड पोलिस ठाणे गाठून रीतसर तक्रार दिली. सहायक अभियंता योगेश देवडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी ओमकार पालेकरवर विरु्ध्द विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.