अंबड : तालुक्यातील गोंदी येथील सिद्धेश्वर परिसरातील गोदावरी नदीपात्रातून तब्बल ५०० ब्रास वाळूचे बेकायदा उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी महसूल विभागाने २१ जणांना दंडात्मक नोटिसा बजावल्या आहेत. या प्रकरणात तब्बल ६ कोटी २९ लाख ७५ हजार रुपयांचा दंड प्रस्तावित करण्यात आला असून, हा दंड न भरल्यास संबंधितांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याची कारवाई केली जाणार आहे.
गत २६ ऑगस्ट रोजी गोंदी येथील सिद्धेश्वर गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी तहसीलदार सोमेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथक गेले होते. त्यावेळी सुमारे ५०० ब्रास वाळूचा अवैध उपसा झाल्याचे निदर्शनास आले. या कारवाईदरम्यान वाळू तस्करांनी तहसीलदार मोहिते तसेच एका कोतवालास धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा आणला होता. याप्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आधीच फौजदारी कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर आता महसूल विभागाने याच प्रकरणात मोठी दंडात्मक कारवाई हाती घेतली आहे.
कारवाईच्या वेळी सुमारे २० 'केण्या' व विविध वाहनांच्या साहाय्याने वाळूचे उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणातील २१ जणांना तीन दिवसांत खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रस्तावित दंडामध्ये वाळूच्या बाजारमूल्यापोटी २ कोटी ७२ लाख ५० हजार रुपये, स्वामित्वधनाच्या दहापट शास्तीपोटी ३ कोटी रुपये आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीपोटी ५७ लाख २५ हजार रुपये, असा एकूण ६ कोटी २९ लाख ७५ हजार रुपयांचा महादंडाचा समावेश आहे. खुलासा समाधानकारक नआल्यास तातडीने वसुलीची मोहीम राबवून संबंधितांच्या मालमत्तांवर दंडाचा बोजा चढविला जाणार आहे.
नोटीस मिळालेल्या २१ जणांमध्ये सिधेश्वर गात, संतोष कांबळे (रा. गोंदी), लखन परदेशी (रा. शहागड), गोपीनाथ सातपुते, गणेश सावंत (रा. छत्रपती संभाजीनगर), मनोज राऊत (रा. गोंदी), स्वप्नील पवार (रा. झिपी तांडा), ऋषीकेश खराद, विकास खराद, अक्षय बनाईत, शामसुंदर खराद, किशोर खराद, राहुल खराद, महादु खराद (रा.. सिद्धेश्वर फाटा), सुरेश चाळगे (रा. वैतागवाडी), भगवान पवार, अतुल म्हस्के, अशोक कुर्लेकर, आसमान ऊर्फ पप्पू गात, अतुल सोळंके (रा. गोंदी) व राम परदेशी (रा. शहागड) यांचा समावेश आहे.
प्रस्तावित दंडाचा तपशील
वाळूचे बाजारमूल्यः २ कोटी ७२ लाख ५० हजार रुपये, स्वामित्वधनाच्या दहापट शास्तीः ३ कोटी रुपये, जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीः ५७ लाख २५ हजार रुपये, एकूण प्रस्तावित दंडः ६ कोटी २९ लाख ७५ हजार रुपये.