Ajit Pawar Jalna Speech:
जालना : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जालना येथील एका भाषणादरम्यान 'गलती से मिस्टेक' झाली. त्यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांऐवजी चुकून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेतले. काही वेळाने चूक लक्षात येताच त्यांनी माफी मागितली.
अजित पवार भाषण करत असताना, बोलण्याच्या ओघात, "स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली," असे विधान त्यांच्याकडून झाले. मात्र, आपली ही चूक त्यांच्या तात्काळ लक्षात आली. त्यांनी आपल्या विधानामध्ये सुधारणा केली आणि उपस्थितांची माफी मागितली. सुधारणा करताना ते म्हणाले, "मी मगाशी काहीतरी बोलताना चुकून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असं बोलून गेलो, माफ करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली."
यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. शिवरायांनी त्या काळात ज्या पद्धतीने राज्यकारभार केला, १८ पगड जाती आणि १२ बलुतेदारांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्या स्वराज्यात सगळ्या जातीचे लोक होते आणि कधीही भेदभाव नव्हता, असे ते म्हणाले.