Agricultural damage due to heavy rains Jalna District
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : दीपावलीचा सण उजेडाचा, आनंदाचा, संपन्नतेचा पण याच दिवशी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र अंधार दाटलेला दिसतो आहे. सोन्यासारखी झेंडूची फुले, जी देवी लक्ष्मीच्या पूजनात, घराघरच्या तोरणांत, देवळांत आणि रांगोळीत शोभा वाढवत आहेत, त्याच फुलांना उगवणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरात मात्र दुःखाचं सावट पसरलं आहे.
अतिवृष्टी, पूर आणि वादळांनी आधीच शेतकऱ्यांची कंबरडे मोडली होती. अनेकांचे कापूस, सोयाबीन, तूर अशी पिकं वाहून गेली. शेतात चिखल आणि ओलाच ओलाच राहिला. या सगळ्या संकटात शेतकऱ्यांनी "किमान झेंडू तरी उपयोगी पडेल, दिवाळीला थोडे पैसे मिळतील" या आशेवर झेंडूची लागवड केली. पण नशिबाने इथेही साथ दिली नाही.
यंदा झेंडूचे पीक चांगले आले, पण बाजारात झेंडूची आवक इतकी प्रचंड झाली की भाव कोसळले सकाळी ५० प्रति किलो तर दुपारी प्रति किलो फक्त १० ते २० रुपये एवढाच दर मिळाला आहे. काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी फुलं घ्यायलाही नकार दिला. दिवाळीच्या दिवशीच शेतकऱ्यांना फुलं शेतात टाकावी लागली त्यांच्या मनातील आशा आणि मेहनतही त्या फुलांसोबतच कोमेजली.
"पावसात भिजलो, वादळात उभं राहिलो, चिखलात चालून झेंडूचं रोप वाचवलं. खतं, औषधं, मजूर, सगळं खर्च केलं. फुलं घेतली आणि बाजारात गेलो पण व्यापारी म्हणाले भाव नाहीत! एवढ्या मेहनतीचं सोनं आज मातीसमान झालं," असं सांगताना घनसावंगी तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराघरात झेंडूच्या फुलांनी देवांच्या पायांना अलंकार चढवले, पण या फुलांना वाढवणाऱ्या हातांवर मात्र निराशेचा थर चढला. जिथं झेंडूने सणाला रंग दिला, तिथंच या शेतकऱ्यांच्या आयुष्यात मात्र तोच झेंडू दुःखाचा रंग घेऊन आला.
दिवाळीचा सण म्हणजे आनंद आणि प्रकाशाचा, पण झेंडू उत्पादक शेतकऱ्यांसाठी तो यंदा अवकाळी अंधाराचा ठरला आहे. त्यांच्या डोळ्यांत झळकणारे दिवे नाहीत, तर मेहनतीचे आणि अपेक्षाभंगाचे अश्रू आहेत.
काही शेतकऱ्यांनी तर "खर्च तरी परत मिळावा" म्हणून दिवाळीच्या दिवशीच बाजारात उभं राहून कवडीमोल दराने फुलं विकली. काहींनी रस्त्याच्या कडेला माळा बनवून विकल्या, तर काहींनी निराश मनाने फुलं शेतातच टाकली. "आमच्या घामाचा सुगंध आज बाजारात वाया गेला. लोकांच्या पूजेसाठी फुलं गेली, पण आमच्या पूजेसाठी मात्र अन्नाचा तुकडा मिळालेला नाही," अशी हळहळ शेतकऱ्याने व्यक्त केली.