Jalna News : वाढोणा डोंगरात अवैध मुरूम उत्खननावर कारवाई File Photo
जालना

Jalna News : वाढोणा डोंगरात अवैध मुरूम उत्खननावर कारवाई

जेसीबी, ट्रॅक्टर-ट्रॉलीसह २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

भोकरदन / पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवाः तालुक्यातील वाढोणा येथील डोंगर परिसरात अवैधरित्या मुरूमाचे उत्खनन करून त्याची चोरी केली जात असल्याचा प्रकार पारध पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत जेसीबी, ट्रॅक्टर-ट्रॉली आणि मुरूम असा एकूण २२ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एका आरोपीसह अन्य फरार व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढोणा येथील डोंगर भागात अवैधरित्या मुरूमाचे उत्खनन सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जेसीबीच्या सहाय्याने डोंगरातून मुरूम खोदून तो ट्रॅक्टरमध्ये भरला जात असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी कारवाई करत १५ लाख रुपये किमतीची विनाक्रमांकाची ईको एक्सपर्ट जेसीबी, ७ लाख रुपये किमतीचा सोनालिका डीआरएक्स ट्रॅक्टर ट्रॉलीसह आणि सुमारे ३ हजार रुपये किमतीचा मुरूम जप्त केला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २२ लाख ३ हजार रुपये आहे.

दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थली असलेले इतर ट्रॅक्टर घेऊन काही जण पसार झाले. या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी ईश्वर पांडुरंग चंडोल (रा. वडाळी, ता. सिल्लोड) याच्यासह फरार आरोपींविरुद्ध पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अवैध उत्खननावर पोलिसांची नजर

अवैधरीत्या गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरूच राहणार असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावले उचलली जात असल्याची भूमिका पोलिस निरीक्षक संतोष माने यांनी व्यक्त केली आहे. गुन्हा दाखल करण्याची कारवाई जमादार गावंडे यांनी केली असून, पुढील तपास सहायक फौजदार एस. एन. जायभाये करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT