जालना : आरटीओ विभागाच्या वायुवेग पथकाच्यावतीने जिल्ह्यातील मंठा व जाफराबाद तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या सहा वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.पकडलेल्या वाहनांवर दीड लाखाची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.विना परवाना वाळू वाहतुक करणारे एक वाहन जप्त करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या निर्देशानुसार तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांच्या मार्गदर्शनाखाली,जालना येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या वायुवेग पथकाने अवैध गौण खनिज वाहतुकीविरुद्ध विशेष तपासणी मोहीम राबविली. ही कारवाई पथकाचे नियंत्रक अधिकारी मोटार वाहन निरीक्षक भीमराज नागरे यांच्या सोबत पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली.
मंठा जाफराबाद टेंभुर्णी परिसरात करण्यात आलेल्या तपासणीत सहा वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली .या वेळी वाहनमालकांना दीड लाखाचा दंड करण्यात आला. विनापरवाना वाळू वाहतूक करणारे एक वाहन जप्त करून ते टेंभुर्णी पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.
या मोहिमेत मोटार वाहन निरीक्षक नीलेश अहिरे, शुभम मोटे व अक्षय पाटील , सहा मोटर वाहन निरीक्षक श्रीमती सोळुंके यांनी सहभाग नोंदविला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांनी अवैध वाहतुकीविरुद्ध महसूल विभाग, पोलीस विभाग व परिवहन विभागाची संयुक्त कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहील, असा इशारा दिला आहे .
तपासणीदरम्यान विनानंबर प्लेट टिप्पर व विनापरवाना वाळू वाहतूक करणारी वाहने आढळून आली. संबंधित वाहनांवर नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.