वडीगोद्री : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस सरकार येताच आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातल्या गोर गरीब जनतेची जबाबदारी सरकारवर आलेली आहे. त्यामुळे ते त्यांचे कल्याण करतील. गोर गरीब लोकांना न्यायाची अपेक्षा असते. त्यामुळे तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल. उशिरा का होईना मराठा आरक्षणासाठी मार्ग काढत असतील तर त्यांचे अभिनंदन आहे. असे मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला पुन्हा एकदा अल्टीमेटम दिला आहे. 5 जानेवारीपर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. सरकार स्थापन झाल्याबद्दल महायुती सरकारला शुभेच्छा देत ते म्हणाले, आता जनतेचे प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. सरकारने 5 जानेवारीपर्यंत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात. जर पुन्हा एकदा मराठा समाज विरोधात गेला तर सत्ता चालवणे सुद्धा अवघड होईल, असा इशारा त्यांनी दिला.
मराठा समाजाचे आंदोलन दीड वर्षापासून सुरु आहे. परंतु मराठा समाजाला न्याय अजून मिळाला नाही. काही महिन्यांपूर्वी मंत्रिमंडळाचे शिष्टमंडळ अंतरवाली येथे आले होते. त्यावेळेस त्यांनी हे सगळे सांगितले होते. त्यामुळे आता 5 जानेवारीपर्यंत संधी दिली आहे. संधीचा सोने करा. अन्यथा मराठे पुन्हा आंदोलन सुरु करतील. असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.