वडीगोद्री : लग्न ११ दिवसांवर आले असताना आपल्या लग्नाचा बस्ता काढून आल्यानंतर तरूणाने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन २७ वर्षीय तरूणाने आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना गुरूवारी (दि.३) रात्री साडेसातच्या सुमारास घडली. राम पांडुरंग धाईत (वय २७) असे या तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील राम धाईत याचे बी.ए.पर्यंत शिक्षण झाले असून त्याचे नुकतेच मंठा तालुक्यातील तळणी येथील एका मुलीशी (मंगळवारी) १५ एप्रिलला लग्न होणार होते. लग्नाची पूर्व तयारी देखील सुरु झाली असून गुरूवारी (दि.३) दोन्ही परिवाराच्या वतीने लग्नाचा बस्ता काढण्यात आला होता.
येत्या अकरा दिवसांवर रामच्या लग्नाची रेशिमगाठ बांधल्या जाणार होती, मात्र ती नियतीला मान्य नव्हती. बस्ता बांधल्यानंतर राम व त्यांचे नातेवाईक सायंकाळी आपल्या मुळ गाव डोमेगाव येथे पोहचले. तेथून आल्यानंतर राम नाराज दिसत होता. त्यानंतर तो कोणाला काहीही न बोलता शेतात गेला. तो नाराज असल्याची बाब कुटुंबातील सदस्यांच्या लक्षात आली. त्यांनंतर त्याच्या भावाने त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी सर्वत्र शोध घेण्यासाठी धावपळ सुरू केली. शेतात शोध घेतला असता शेतातील एका लिंबाच्या झाडाला त्याने गळफास घेतल्याचे त्याच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थ व नातेवाईकांनी बेशुद्धवस्थेत त्याला अंबड शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याने कोणत्या कारणातून टोकाचे पाऊल उचलले याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.