A provision of Rs 14,000 crore has been made for railway lines in Marathwada
जालना, पुढारी वृत्तसेवा :
मराठवाड्यासाठी महत्त्वाचे असलेल्या अहमदनगर-बीड परळी, जालना-जळगाव आणि नांदेड- वर्धा या रेल्वेमार्गासाठी तब्बल १४ हजार कोटींची तरतूद केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. शिवाय छत्रपती संभाजीनगर शहराला सीईआर प्रोग्राम अंतर्गत निधी मिळणार असल्याची माहिती माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.
जालना शहरातील भाजप जिल्हा कार्यालयात बुधवार दि.४ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार नारायण कुचे, महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे, नगरसेवक राजेश राऊत व इतरांची उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात सर्वच क्षेत्रासाठी भरीव तरतूद केली असून, देशाला प्रगतीकडे नेणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी आणि मराठवाड्यासाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे.
मराठवाडा वॉटरग्रीडसाठी तांत्रिक आणि आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे. अहमदनगर-बीड-परळी या मार्गासाठी चार हजार ९५७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जालना-जळगाव रेल्वे मार्गासाठी पाच हजार ८०४ कोटी रुपये निधीस मंजुरी देण्यात आली आहे.
नांदेड वर्धा रेल्वेसाठी तीन हजार ४४५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात पाच वर्षांत सीईआर प्रोग्रामअंतर्गत पाच हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासाठी आर्थिक, औद्योगिक आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी निधी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.