A grandmother and her grandson drowned in the waters of the Kundalika River.
जालना, पुढारी वृतसेवाः जालना शहरातील कुंडलिका नदीपात्रात पासष्ट वर्षांच्या आजीसह नातवाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री झाली. या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील वलीमामु दर्गा परिसरात असलेल्या कुंडलिका नदीपात्रात राज कृष्णा खरात (५) हा खेळताना पडल्याने त्याला काढण्यासाठी त्याची आजी जनाबाई खरात (६५) या पाण्यात उतरल्या. ज्या ठिकाणी राज बुडाला होता तेथे झाडे व शेवाळ साचलेले असून कंत्राटदाराने त्याच ठिकाणी पाईपलाईनसाठी मोठे खड्डे खोदले होते. त्यात पडल्याने राजचा व त्याच्या आजीचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.
मयत जनाबाई खरात यांचा मुलगा कृष्णा याच्यासह नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी नदीच्या पाण्यात शोध घेतल्यानंतर दोघांचे मृतदेह रात्री सापडले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. एकाच वेळेस आजी व नातवांच्या मृत्युमुळे खराब कुटुंबीयावर संकट कोसळले.
घटनास्थळी सदर बाजार पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. मयतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले होते अशी माहिती सूत्रांनी दिली. मयत जनाबाई यांच्यासह नातू राज कृष्णा खरात याच्यावर शुक्रवारी अंतिम संस्कार करण्यात आल्याचे समजते.
कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
जनाबाई खरात व राज खरात यांच्या मृत्यूप्रकरणी पाईपलाईनसाठी खड्डा खोदणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सदर बाजार पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत कृष्णा खरात यांनी केली आहे.