जालना ः पहिल्या छायाचित्रात तालुक्यातील मानदेऊळगाव येथील बुद्धमूर्तीची विदेशातील भिक्खू संघानी नुकतीच पाहणी केली. सध्या बुद्धमूर्ती बसविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. यामुळे मानदेऊळगाव धार्मिक पर्यटन केंद्र होणार आहे. pudhari photo
जालना

Buddha statue : दीड कोटी खर्चातून उभारली 81 फूट बुद्धमूर्ती

मानदेऊळगाव पर्यटन नकाशावर; राज्यातील सर्वांत उंच बुद्धमूर्तीची स्थापना

पुढारी वृत्तसेवा

जालना ः जालना शहरापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या मानदेऊळगाव येथे 20 एकरात 81 फूट उंचीची तथागत गौतम बुध्दांची भव्य मूर्ती उभारण्यात आली असून, राज्यातील सर्वांत उंच बुद्धमूर्ती म्हणून या स्थळाची नवी ओळख निर्माण होणार आहे. जालना - जळगाव मार्गावरील हे ठिकाण अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या मार्गावर असल्याने भविष्यात धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या प्रकल्पासाठी डोंगराचे खोदकाम जेसीबीच्या साहाय्याने दोन महिन्यांत पूर्ण करण्यात आले असून त्यासाठी सुमारे 12 लाख रुपये खर्च आला. तसेच 21 फूट उंच स्ट्रक्चर बांधकामासाठी 55 लाख रुपये आणि बुद्धमूर्ती तयार करण्यासाठी 74 लाख रुपये असा एकूण सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. ही चार टनांची बुद्धमूर्ती छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा येथील हुबे कुशल कारागिराने घडवली आहे.

बुद्धमूर्ती बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे 1 मार्च रोजी विविध देशांतील भिक्खू संघांनी या स्थळाला भेट देत वंदन करून समाधान व्यक्त केले. यावेळी डॉ. असीन उत्तमतारा सयाडो (म्यानमार), पूज्य भदंत अजान अमनात (थायलंड), हृेनरेबल थुशी सीमा दा (जपान), भदंत सुगत शांतेय (बौद्ध गया) यांच्यासह नेपाळ, व्हिएतनाम, तिबेट आदी देशातील भिक्खू संघांची उपस्थिती हेाती. याप्रसंगी उद्योजक तथा स्टील कंपनीचे अध्यक्ष घनश्याम गोयल यांनी भिक्खू संघाला वंदन केले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

या भव्य बुद्धमूर्तीचा 31 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वंचितचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर, केंद्रीय मंत्री आठवले, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, खा. डॉ. काळे, आ. अण्णा बनसोडे, जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या उपस्थितील लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

मी बौद्धगया येथे भेट दिली असता, तेथील 80 फूट उंच बुद्धमूर्ती पाहून प्रेरणा घेतली. महाबोधी मंदिर परिसरातील भव्यतेने प्रभावित होऊन आपल्या परिसरातही अशीच दिव्य बुद्धमूर्ती उभारण्याचा संकल्प केला. मानदेऊळगाव येथे 81 फूट उंच बुद्धमूर्ती साकारली आहे. त्यासाठी आतापर्यंत सुमारे दीड कोटीचा खर्च झाला आहे.
विलास डोळसे, प्रदेशाध्यक्ष, भीम कायदा संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT