6 posts of teachers in Zilla Parishad schools are vacant, students, parents blocked the way
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील आन्वा येथे शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थी व पालकांनी आन्वा-भोकरदन जळगाव सपकाळ रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पालकांनी आन्वा-भोकरदन, जळगाव सपकाळ या रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. गेल्या चार वर्षांपासून येथील प्रशालेतील शिक्षकांचे सहा पद रिक्त असून याकडे जिल्हा परिषद शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत असल्याने विद्यार्थी पालकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहेत.
या प्रशालेतील दोन शिक्षकांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या झाल्यामुळे सहा शिक्षकांच्या जागा रिकाम्या असल्याने शिक्षण विभागाने शिक्षक नियुक्त करण्यात यावी, अशी मागणी यावेळी शालेय व्यवस्थापन समिती व पालकांवर्गातून करण्यात आली. आन्वा जि.प. शाळेत पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत. या शाळेत सध्या ६०० विद्यार्थी असून नवीन दाखले घेऊन विद्यार्थी पालक येत आहेत. त्यामुळे विद्यार्थी संख्या वाढत आहे.
या शाळेत १६ शिक्षकांची पद मंजूर आहेत. परंतु प्रत्यक्षात मुख्याध्यापकासह आठ ते दहा शिक्षकांवर शाळा चालविण्यात येत आहे. या प्रशालेत दोन शिक्षकांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांसह विद्यार्थी वर्गातून जिल्हा परिषद प्रशासनाला वेळोवेळी शिक्षकांची मागणी केली जात होती. तरीही कायमस्वरूपी शिक्षक उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थ व पालकांमध्ये शिक्षण विभागाविरोधात संताप व्यक्त होत आहे.
येथील जि.प प्रशालेसाठी शिक्षण विभागाने ३ जुलै रोजी चार शिक्षकांची नियुक्तीचे आदेश दिले असताना आजपर्यंत हे शिक्षक शाळेवर हजर का झाले नाही असा प्रश्न पालकांतून उपस्थित केला.