34 people have filed nominations for the municipal elections.
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज खरेदी आणि दाखल करण्याच्या प्रक्रियेने उच्चांक गाठला आहे. गेल्या चार दिवसांच्या कालावधीत विक्री झालेल्या एकूण अर्जाची संख्या २ हजार ४८७ वर पोहोचली असून, प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्यासाठीही उमेदवारांची झुंबड उडाली आहे. शनिवारी एकाच दिवशी ३४ उमेदवारी अर्ज दाखल केले असून आजपर्यत ४८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांकडून प्राप्त माहितीनुसार शनिवार (२७) रोजी शहरातील १ ते १६ प्रभागांमधून ३९२ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली. २३ डिसेंबरपासून महानगरपालिका जालना शहर महानगरपालिका सुरू झालेल्या या प्रक्रियेत आजपर्यत २ हजार ४८७ संच इच्छुकांनी खरेदी केले आहेत.
प्रभागनिहाय राजकीय चुरस वाढत असल्याने इच्छुकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. सुरुवातीचे काही दिवस केवळ अर्जाची विक्री होत असताना, आता प्रत्यक्ष अर्ज भरण्याकडे इच्छुकांचा कल दिसत आहे. शनिवारी एकाच दिवशी १६ प्रभागांतून एकूण ३४ नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाली आहेत.
आजपर्यंत दाखल झालेल्या ४८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्जाबाबत प्रशासनाने अत्यंत महत्त्वाची सूचना जारी केली आहे. रविवार (२८) रोजी सुट्टी असल्याने अर्ज विक्री आणि स्वीकृती बंद राहणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३० डिसेंबर ही अंतिम तारीख राहणार आहे. ३० डिसेंबर रोजी नवीन अर्ज विक्री दुपारी २:०० वाजेपर्यंतच केली जाणार असुन भरलेले अर्ज दुपारी ३:०० वाजेपर्यंतच स्वीकारले जातील. इच्छुकांनी वेळेची ही मर्यादा पाळून अर्ज वेळेत दाखल करावेत, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
प्रशासकीय देखरेख कायम
जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली पाचही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांत चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. प्रत्येक अर्जाची तांत्रिक बाजू आणि आचारसंहितेचे पालन यावर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. पारदर्शक निवडणुकीसाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक कक्षाकडून देण्यात आली आहे.