24 people charged in electricity theft case, action taken in three villages in Bhokardan taluka
जालना, पुढारी वृत्तसेवाः भोकरदन तालुक्यातील कोदा, वाकडी व जळगाव सपकाळ या गावांत महावितरणने राबवलेल्या धडक मोहिमेत आकडे टाकून वीजचोरी होत असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी २४ जणांवर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महावितरणच्या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.
महावितरणच्या आन्वा शाखेचे कनिष्ठ अभियंता प्रदीप गव्हांडे यांनी सहकाऱ्यांसह विविध गावांत वीजचोरी तपासणी मोहीम राबवली. कोदा गावात ताराचंद रामदास फुसे, दिलीप मंजीतराव व्यवहारे, सीताराम काळूबा बावस्कर, ऋषी उत्तम घनघाव, संजय रामदास फुसे, शांताबाई रमेश घनघाव, अशोक विठोबा दांडगे, आनंदा भीमराव बदर, महादू रघुनाथ बोराडे, रतन हरिभाऊ बोराडे, उत्तम पंडित बोराडे व नारायण त्रंबक बोराडे यांच्यावर लघुदाब वाहिनीवर आकडे टाकून घरासाठी वीजचोरी केल्याचा आरोप आहे.
त्यांनी १२ महिन्यांपासून १० हजार ५९२ युनिट वीजचोरी करून महावितरणचे १ लाख ७१ हजार ३६० रुपयांचे नुकसान केले. प्रत्येकी २ हजार रुपयांप्रमाणे त्यांना २४ हजार रुपये तडजोड शुल्क आकारण्यात आले. वाकडी गावात देवा विठ्ठल निकम, कैलास मोतीराम वाघ, सांडू भवर, राजू दादुबा बावणे, अंबादास बाळा बावणे, म्हातारजी तुकाराम पाडळे, अंकुश सखाराम पाडळे, कैलास सखाराम पाडळे, सुमित सुनील साळवे, अशोक कडूबा साळवे व बाळू उत्तम साळवे यांच्यावर आकडा टाकून वीजचोरी केल्याचा आरोप आहे. त्यांनी १२ महिन्यांपासून ६ हजार ५६९ युनिट वीजचोरी करून महावितरणचे १ लाख ३९ हजार ९२० रुपयांचे नुकसान केले. प्रत्येकी २ हजार रुपयांप्रमाणे त्यांना २२ हजार रुपये तडजोड शुल्क आकारण्यात आले. सहायक अभियंता प्रदीप गव्हांडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव सपकाळ गावात वॉटर फिल्टर चालवणारा गोकुळ साहेबराव सपकाळ यांच्यावर आकडा टाकून वाणिज्यिक वापरासाठी वीजचोरी केल्याचा आरोप आहे. त्याने १२ महिन्यांपासून १२०९ युनिट वीजचोरी करून महावितरणचे ३७ हजार ६७७ रुपयांचे आर्थिक नुकसान केले. त्यास १० हजार रुपये तडजोड शुल्क आकारण्यात आले.