1275 hectares of crop damage in Jalna district
जालना, पुढारी वृत्तसेवा : रब्बी हंगामातील पिके हाताशी येत असतानाच निसगनि पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे. जालना जिल्ह्यात ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी १९ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे घनसावंगी, मंठा, आणि बदनापूर या तीन तालुक्यांतील तब्बल १२७५ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. तीन तालुक्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर झाला असून, अजून भोकरदन आणि जालना तालुक्यांचा अहवाल येणे बाकी असून, नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे बळीराजावर संकट ओढावले आहे. बदनापूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. सुमारे ६१९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सुमारे १२५ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.
यासाठी १ कोटी ८४ हजार ८०० रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात आली आहे. घनसावंगी तालुक्यात ९४३ शेतकऱ्यांच्या ५९६ हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून तेथे १ कोटी १ लाख ८९ हजार ७०० रुपयांची मदत मागण्यात आली आहे. मंठा तालुक्यात १५३ शेतकऱ्यांच्या ६५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून १० लाख ४० हजार ४०० रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात आली आहे.
शासनाने जाहीर केलेल्या दरानुसार जिरायती पिकांसाठी प्रतिहेक्टर ८ हजार ५००, बागायती पिकांसाठी २७ हजार तर फळपिकांसाठी २२ हजार ५०० रुपये इतकी मदत देण्यात येणार आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांकडून होत आहे.
या गावांना बसला फटका
बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव, ढोकसाळ, भाकरवाडी, डावरगाव, घिरसगाव घाटी, सागरवाडी, ढासला; घनसावंगीतील टेंभी मंडळातील ४ गावे, तीर्थपुरी १, पानेवाडी ४, जांबसमर्थ ३, रांजणी ९, कुंभार पिंपळगाव मंडळातील ३ गावे; तर मंठा तालुक्यातील वझर सरकटे, भुवन, दहा या गावांतील पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.
जवळपास २ कोटी १३ लाख ९४ हजार ९०० रुपयांच्या शासकीय मदतीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
बदनापूर, घनसावंगी, मंठा आणि जालना तालुका कार्यालयांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहवाल सादर करण्यात आला.
भोकरदन व जालना तालुक्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. हे अहवाल प्राप्त झाल्यानंतर नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.