जालना येथे सापडलेला शिलालेख दाखवताना अभ्यासक अनिल दुधाणे आणि अथर्व पिंगळे  Pudhari Photo
जालना

जालना : अंबडला आढळला अकराव्या शतकातील मराठी शिलालेख !

जालन्याच्या इतिहासावर नव्याने प्रकाश, इतिहास संशोधक रामभाऊ लांडे यांचे संशोधन, चालुक्य घराण्याशी संबंध

पुढारी वृत्तसेवा

अंबड, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्याच्या इतिहासावर नवा प्रकाश टाकणारा अकराव्या शतकातील एक शिलालेख अंबड तालुक्यातील किनगाव येथे सापडला असून, इतिहास संशोधक रामभाऊ लांडे यांनी संशोधन केलेल्या गद्यगळ रूपी शिलालेखाचे वाचन इतिहास अभ्यासक अनिल दुधाणे आणि अथर्व पिंगळे यांनी केले आहे.

शिलालेखात 'सालुक' म्हणजेच चालुक्य वंशातील राणक 'अय्यण' याने केलेल्या एका दानाची नोंद केलेली आहे. अकराव्या शतकात कल्याण येथील चालुक्य घराण्याचे दक्षिण भारतावर राज्य होते. त्या घराण्यातील 'विक्रमादित्य पाचवा' याचा 'अय्यण दुसरा' या नावाने ओळखला जाणारा एक भाऊ असून तो विक्रमादित्यानंतर अल्पकाळ राज्यावर आला होता. प्रस्तुत शिलालेखातील अय्यण हा एक तर अय्यण दुसरा किंवा त्याचा कुणीतरी थेट वंशज असावा, असा पिंगळे यांचा तर्क आहे.

अय्यण दुसरा याने सत्तासंघर्षामुळे गोदावरीच्या उत्तरेकडे स्थलांतर करून स्वतंत्र राज्य स्थापन केले असावे आणि त्याच्या वंशजांनी पुढील काळात त्या प्रदेशावर शासन केले असावे, कारण त्या प्रदेशात चालुक्यांच्या मुख्य शाखेच्या अस्तित्वाचे फारसे पुरावे मिळत नाहीत. तसेच बाराव्या शतकाच्या उत्तरार्धातील यादव राजा 'भिल्लमदेव पाचवा' याने आपली स्वतंत्र सत्ता स्थापन करतेवेळी मराठवाड्यातील काही लहान शासकांना पराभूत केल्याच्या उत्तरकालीन साधनांतील उल्लेखांवरूनही या शक्यतेला दुजोरा मिळतो.

या विषयावर विस्तृत शोधलेख लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे. प्रस्तुत शिलालेख संपूर्णतः मराठी भाषेत असून अकराव्या शतकातील मराठी भाषेचा नमुना म्हणून महत्त्वाचा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर मराठीतील अतिशय प्राचीन शिलालेखांपैकी एक ठरणार्‍या या गद्यगळ शिलालेखाचे प्रकाशात येणे औचित्यपूर्ण आहे. गद्यगळ संशोधनासाठी लक्ष्मण बोबंले व मुकेश गाडेकर यांची मोलाची मदत झाली. गद्यगळ अर्थात दान केल्याचा लेख असून ज्याला दान केले आहे. त्याने मिळालेल्या दानाचा प्रामाणिकपणे उपभोग घ्यावा, असे वचन असते वचन मोडल्यास त्याच्या घराण्यास शिव्याशाप लागेल. या गद्यगळवर सूर्य, चंद्र, गर्दभ आणि कोरीव लेख असून २०१८ पासून गद्यगळचे संशोधन वाचन सुरू असल्याचे लांडे यांनी म्हटले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT