भोकरदन; पुढारी वृत्तसेवा : नळाचे पाणी भरताना विद्युत मोटारीच्या तारांचा स्पर्श होवून जोरदार विजेचा शॉक लागल्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना (दि.२७) रविवारी सकाळी दहाच्या सुमारास भोकरदन शहरातील बालाजी मंदिराजवळ घडली. नम्रता संदीप सुरडकर (वय १६) असे या मृत मुलीचे नाव आहे.
पावसाळा अर्धा उलटूनही तालुक्यात अपेक्षित पाऊस नसल्याने सर्वच जलसाठे कोरडेठाक पडले आहे. शहराला पाणी पुरवठा करणारे जुई धरणही रिकामे झाले असून शहरात मागील दोन महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली असून, पालिकेकडून आठ ते दहा दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नळाला आलेले पाणी भरण्यासाठी प्रत्येकजण घाईगडबड करीत असल्याचे दिसून येते. पाणी भरण्याच्या याच घाईगडबडीने शहरातील नम्रता सुरडकर या विद्यार्थीनीचा बळी घेतल्याची चर्चा आहे. शहरातील बालाजी मंदिर परिसरातील धोबी गल्ली येथील संदीप सुरडकर यांची न्यू हायस्कूल शाळेत दहावीत शिकणारी नम्रता नावाची मुलगी नळाला पाणी आले म्हणून घाईगडबडीने विजेची मोटार लावली आणि पाणी भरत होती. त्याचवेळी अचानक तिच्या हाताचा स्पर्श विद्युत मोटारीच्या तारांना झाल्याने तिला जोराचा शॉक लागला. ही बाब लक्षात येताच घरच्यांनी तिला तातडीने शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा :