हिंगोली : हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अंजली रमेश यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या बदलीचे आदेश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य सचिव व्ही. राधा यांनी मंगळवारी काढले आहेत.
हिंगोली जिल्हा परिषदेत मागील आठ महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी जिल्हा परिषदेच्या कारभारात चांगलीच सुधारणा केली होती. विशेषतः जिल्हयातील शिक्षण व्यवस्था व आरोग्य सेवेवर त्यांचा अधिक भर होता. ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य सेवा मिळाली पाहिजे यासाठी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांना सरप्राइज व्हिजिट देऊन तपासणी सुरु केली होती.
या शिवाय जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या सोबत शिक्षण व्यवस्थेत बदल घडवण्यासाठी प्रयत्न केले होते. यामध्ये त्यांनी कमी गुणवत्ता असलेल्या शाळेतील शिक्षकांवर कारवाईचा धडका सुरु केला होता. त्यात तीन शिक्षकांवर निलंबनाची कारवाईही केली होती.
दरम्यान, मध्य प्रदेश संवर्गातून महाराष्ट्रात रुजू झालेल्या अंजली रमेश यांची हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश मंगळवारी काढण्यात आले आहे. अंजली रमेश यांनी अहमदाबाद येथून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले असून त्यानंतर त्यांनी आयआयटी मद्रास येथून बीटेक आणि एमटेक पूर्ण केले आहे.
मध्य प्रदेश राज्यात त्यांनी उपविभागीय अधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्या मध्य प्रदेश संवर्गातून महाराष्ट्र शासनाकडे रुजू झाल्या आहेत. त्यानंतर त्यांची हिंगोलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. पुढील आठवड्यात त्या हिंगोलीत रुजू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.