गिरगाव : पुढारी वृत्तसेवा; वसमत तालुक्यासह गिरगाव परिसरात हळद पिकाची दरवर्षी मोठ्या प्रमाणत लागवड केली जाते. तर याही वर्षी मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेली आहे. सध्या या भागात हळद काढणीला सुरुवात झाली आहे.
आतापर्यंत अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणाचा परिणाम पिकांवर झाला होता. तर आता पीक काढणीनंतर सर्वकाही शेतकऱ्यांसाठी संपले असे नाही. कारण अनियमित पावसाने उसंत घेतली असली तरी मराठवाड्यात उन्हाचा पारा सध्या हा वाढतच आहे. सध्या गिरगावसह परिसरात हळद काढणीची कामे जोमात सुरु आहेत. काढणीनंतर हळद पक्की बनवण्यासाठी शिजवणे गरजेचे आहे. पण सध्या उन्हाच्या झळा शेतकऱ्यांना सहन होत नसल्याने हळदीवर रात्रीच प्रक्रिया केली जात आहे. त्यामुळे दिवसा काढणी कामे आणि रात्रीतून हळद शिजवणे असे चित्र सध्या शेतशिवारात पाहवयास मिळत आहे.
हळद काढणीनंतर पक्की बनवण्यासाठी ती शिजवणे गरजेचे आहे. वाफेवर ही हळद शिजवण्यासाठी कुकर लावला जातो. या कुकरला जाळण घालून निर्माण होणाऱ्या वाफेवर ही हळद शिजवली जाते. याकरिता शेतकऱ्यांना रात्र-रात्र जागून काढावी लागत आहे. शिवाय ही प्रक्रिया केल्याशिवाय हळद पक्की होतच नाही. उन्हापासून बचावासाठी सायंकाळी सहानंतर शेतकरी वाफेची भट्टी सुरु करीत आहेत. तसेच भट्टी पेटवल्यानंतर दोन तासानंतर वाफ तयार होण्यास सुरवात होते आणि त्या वाफेवर मग हळदीची प्रक्रिया केली जाते.
हळद काढणीची कामे झाली आहेत. आता हळद शिजवण्यासाठी शेतशिवारात भट्ट्या पेटल्या आहेत. पण ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कारण वाढत्या तापमानामुळे पाणी पातळी पण खालावली आहे. त्यातच महावितरण विभागाकडून अघोषित भारनियमन सुरु आहे. तसेच ग्रामीण भागात भारनियमनाच्या व्यतिरिक्त सुध्दा अवेळी बत्तीगुल होत असल्याने शेतकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. त्यात सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे कधी पाऊस येईल आणि नुकसान होईल, या भितीपोटी दिवसभर हळद काढणी कामे आणि रात्रीतून ही प्रक्रिया केल्याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकऱ्यांची दमछाक होताना दिसून येत आहे.
हळद पीक जोमात काढणी सुरू असताना पावसाळ्यात जास्त प्रमाणात झालेल्या पावसामुळे हळद क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्याने कंद सडले गेले. तर काही ठिकाणी हळदीला कीड लागली असल्याने आढळून येत आहे. कारण अनेक दिवस पाण्याचा निचराच झाला नसल्याने ही परस्थिती ओढावली असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. त्यामुळे आता खराब अवस्थेतील पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडत आहे. शिवाय वाढत्या उन्हामुळे दिवसा हळद शिजवण्याची प्रक्रिया शक्य नसल्याने रात्री भट्ट्या पेटविल्या जात आहेत. त्यातच या पिकविलेल्या मालाला योग्य भाव मिळेल का? या पिकांवर वर्षभरात केलेला खर्च आणि आता शेवटच्या टप्प्यात झालेला खर्च सुद्धा निघतो का? असे अनेक प्रश्न सध्या शेतकऱ्यासमोर उभी राहिली आहेत.
सध्याची ही वाढलेली महागाई, मुलांच्या शाळेचा खर्च, दवाखाना, लग्नकार्य अशा अनेक समस्या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाल्या आहेत.