सेनगाव ः तालुक्यासह परिसरात कोवळ्या पिकांवर वन्यप्राण्यांनी ताव मारण्यास सुरुवात केली असून प्राण्यांच्या उच्छादामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. वन विभागाने या परिसरात असलेल्या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्यांतून केली जाऊ लागली आहे.
तालुक्यामध्ये जून महिन्यातच पेरण्या आटोपल्या असून सोयाबीन व इतर पिके वार्यावर डोलू लागले आहेत. मागील तीन दिवसात झालेल्या हलक्या ते मध्यम पावसामुळे या पिकांना जीवदान मिळाले आहे. सध्या पिके कोळपणीला आली आहेत. मात्र या कोवळ्या पिकांवर वन्य प्राणी ताव मारत असल्याचे चित्र आहे. रात्रीच्या वेळी असलेली पिके सकाळी पाहिल्यानंतर वन्य प्राण्यांच्या उच्छादामुळे भुईसपाट झाल्याचे दिसू लागली आहे.
बोरखेडी, हिवरखेड़ा, खड़की, धोतरा, हत्ता, कापडसिंगी शिवारात वन्यप्राणी कळपाने राहू लागले आहेत. रोही, हरीण, वानर शेतामध्ये धुमाकूळ घालत असल्याचे चित्र आहे. या परिसरात शेकडो एकर पिकाची नासाडी झाली आहे. यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. या परिसरात वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी शेतकर्यांसह विविध संघटनांनी वेळोवेळी वन विभागाकडे निवेदन सादर केले आहे. मात्र वन विभागाला प्राण्यांचा बंदोबस्त करता आला नाही.
या प्रकारामुळे शेतकर्यांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे. परिसरात पिकाची नासाडी झाल्यामुळे शेतकर्यांवर दुबार पेरणीची वेळ आल्याचे शेतकर्यांनी सांगितले.
शेतातील झालेल्या नुकसानीची ऑनलाईन तक्रार करता येत नसल्यामुळे शेतकरी दुहेरी अडचणीत सापडले आहेत. वन विभागाने या परिसरातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकर्यांतून केली जात आहे.