हिंगोली (बाभूळगाव) : सेनगाव तालुक्यातील बाभूळगाव येथे सोमवारी रात्री पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून पत्नीने पतीच्या डोक्यात कत्तीने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खूनानंतर पत्नीने मृतदेह पेटवून आत्महत्या झाल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी पत्नीचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाभूळगाव येथील कैलास गलंडे हे पत्नी सुमीत्रा गलंडे व दोन मुलांसह वास्तव्यास होते. सोमवारी रात्री दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि कैलास यांनी हातात कत्ती घेत सुमीत्रावर धाव घेतली. यावेळी आत्मसंरक्षणाच्या हेतूने सुमीत्रानेच कत्तीने त्यांच्या डोक्यात जोरदार वार केला. या हल्ल्यात कैलास गंभीर जखमी झाले आणि जागीच मृत्यूमुखी पडले.
पतीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुमीत्रा घाबरली आणि परिस्थिती लपवण्यासाठी तिने दुचाकीतील पेट्रोल मृतदेहावर ओतून त्याला पेटवून दिले. त्यानंतर कैलास यांनी दारूच्या नशेत स्वतःला पेटवून घेतल्याचा बनाव रचला.
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय अधिकारी आंबादास भुसारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके व इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
पोलीस तपासात कैलास यांच्या डोक्यावर झालेल्या गंभीर जखमा आढळून आल्या. वैद्यकीय अहवालानंतर हे शस्त्राने झालेले वार असल्याचे स्पष्ट झाले. यावरून पोलिसांनी सुमीत्रा हिच्याचवर संशय घेत चौकशी केली असता, मृत कैलास यांचा मुलगा गणेश गलंडे याच्या तक्रारीवरून रात्री उशिरा गोरेगाव पोलिस ठाण्यात सुमीत्रा गलंडे हिच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या सुमीत्रा फरार असून तिचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद झळके करत आहेत.