औंढा नागनाथ : तालुक्यातील वसई येथे प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ मार्च रोजी वसई येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर प्रांगणात काही ग्रामस्थांनी सार्वजनिक जागेवर ८ बाय १० फुटांचा ओटा बांधून त्यावर महाराजांचा अश्वारूढ पुतळा प्रतिष्ठापित केला. या कामासाठी ग्रामपंचायत किंवा महसूल प्रशासनाची कोणतीही रीतसर परवानगी घेण्यात आली नव्हती. ग्रामपंचायत अधिकारी सुनील बाबुराव राठोड यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. प्रशासनाने पुतळा झाकून ठेवण्याच्या सूचना देऊनही संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर ही कायदेशीर कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी राम जयकुमार सावळे, ओमकार संतोष सावळे, कृष्णा ज्ञानदेव सावळे, प्रशांत दिलीप सावळे आणि ज्ञानेश्वर केशवराव सावळे या पाच ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सध्या पोलीस उपनिरीक्षक शेख खुदुस हे पोलीस निरीक्षक जी. एस. राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
"गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये."— जी. एस. राहिरे (पोलीस निरीक्षक, औंढा)