हिंगोली

वसमतच्या बेकरी शोरूमवर; ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ

दहा, पंधरा दिवसांचे शिळे पदार्थ विक्रीस?, अन्न व औषध प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी

पुढारी वृत्तसेवा

खदीर अहेमद

वसमत : शहरातील कारखाना रोड परिसरातील काही बेकरी शोरूममध्ये ग्राहकांना तब्बल १० ते १५ दिवस जुने, शिळे अन्नपदार्थ विक्रीस दिले जात असल्याची धक्कादायक चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. केक, पेस्ट्री, डोनट, टोस्ट, खारी, विविध प्रकारची मिठाई यांसारखे पदार्थ खुलेपणाने विक्रीस ठेवले जात असून त्यावर उत्पादन तारीख (मॅन्युफॅक्चरिंग डेट) व एक्सपायरी डेट स्पष्टपणे नमूद नसल्याचेही सांगितले जात आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी स्वच्छतेचे निकष पाळले जात नसून, महिनाभर जुने पदार्थही ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत. विशेषत: लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक हे बेकरी पदार्थ मोठ्या प्रमाणावर खात असल्याने त्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.

स्वच्छतेचा अभाव, नियमांना तिलांजली देत बेकऱ्यामध्ये अन्नपदार्थ खुले ठेवणे, हातमोजे व हेडकॅप न वापरणे, धूळ व माशांचा त्रास, तसेच योग्य व्यवस्था नसणे असे प्रकार काही बेकरींमध्ये दिसून येत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. अन्न सुरक्षा नियमांनुसार प्रत्येक खाद्यपदार्थावर उत्पादन व अंतिम वापर तारीख नमूद करणे बंधनकारक आहे. मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे.

अन्न व औषध प्रशासनाने तपासणी करावी

या प्रकाराची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन विभागाने तातडीने कारखाना रोड परिसरातील बेकरी शोरूमची अचानक तपासणी करावी, नमुने घेऊन प्रयोगशाळेत चाचणी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

चौकट

नागरिकांचा संताप

“आम्ही विश्वासाने मुलांसाठी केक-पेस्ट्री घेतो; पण जर १५ दिवसांचे शिळे पदार्थ विकले जात असतील तर हा सरळ जीवाशी खेळ आहे,” अशी प्रतिक्रिया एका ग्राहकाने व्यक्त केली. संबंधित विभागाने वेळेत कारवाई न केल्यास मोठा आरोग्यप्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशाराही देण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT