चोरट्यांनी डॉक्टरसह सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याचे घर फोडले file photo
हिंगोली

चोरट्यांनी डॉक्टरसह सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याचे घर फोडले

लाखोंचा ऐवज लंपास; अंबिकानगर भागातील घटना, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून पाहणी

पुढारी वृत्तसेवा

Thieves Burglarize Homes of Doctor and Retired Bank Official

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : हरातील अंबिकानगर भागात चोरट्यांनी एका डॉक्टरचे व सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याचे घर फोडून लाखोंचा ऐवज पळविल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. हिंगोली शहर पोलिस ठाण्याच्या पथकासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्याची तयारी चालवली आहे.

शहरातील अंबिका नगर भागात डॉ. विकास देवकर यांचे घर आहे. त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर सेवानिवृत्त बँक अधिकारी दिलीप देशमुख हे राहतात. ६ मार्च रोजी देशमुख कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. तर दोन दिवसांपूर्वीच डॉ. देवकर हे मुलाच्या उपचारासाठी कुटुंबीयांसह मुंबई येथे गेले होते. यावेळी घराला कुलूप होते.

दरम्यान, घराला कुलूप असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराचा कुलूप कोयंडा तोडून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी घरातील साहित्याची नासधूस केली त्यानंतर घरातील कपाट तोडून त्यातील सोन्या चांदिचे दागिने व ९ हजार रुपये रोख असा ऐवज पळविला. त्यानंतर चोरट्यांनी देशमुख यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

त्यांच्या घरातील दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी पळविले. दरम्यान, शनिवारी सकाळी डॉ. देवकर यांचा पुतण्या घराजवळ आला असतांना त्याला घराच्या दरवाजाचा कुलूप व कोयंडा तुटलेला दिसून आला. त्याने तातडीने सदर प्रकार त्यांच्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर या घटनेची माहिती हिंगोली शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक संदीप मोदे, सहायक पोलिस निरीक्षक युवराज वाघमारे, जमादार संजय मार्के, अशोक धामणे, संतोष करे, गणेश लेकुळे, गणेश वाबळे, शंकर ठोंबरे, जोगे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या पथकानेही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

पोलिसांकडून सीसीटीव्हीचा शोध सुरू

घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असता श्वान चोरट्यांचा माग काढू शकले नाही. त्यानंतर आता पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या दोन्ही घटनेमध्ये सुमारे ३० ते ३५ तोळे सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी पळविल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT