महायुतीसह महाविकास आघाडीत बंडखोरीचे संकेत  file photo
हिंगोली

Assembly Election : महायुतीसह महाविकास आघाडीत बंडखोरीचे संकेत

पुढारी वृत्तसेवा
भिमराव बोखारे

वसमत : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. २९ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असल्याने इच्छुकाची लगीनघाई सुरू झाली आहे. वसमत विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार असल्याचे चित्र वरवरून दिसत असले तरी महाविकास आघाडी व महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचे चित्र आहे. दोन्ही आघाड्यांना बंडखोरांची भीती आतापासूनच सतावू लागली आहे. त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीतील उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.

वसमत विधानसभा मतदार संघात १ लाख ६३ हजार ६१३ पुरुष मतदार, १ लाख ५३ हजार ८७२ महिला मतदार व सहा तृतीयपंथी असे एकूण ३ लाख १७ हजार ४९१ मतदार आहेत. वसमत विधानसभा मतदार संघात ३२७ मतदान केंद्रांचा समावेश आहे. प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

तर दुसरीकडे महायुती व महाविकास आघाडीतील इच्छुकांनी उमेदवारी मिळविण्यासाठी आपापल्या पक्षांच्या पक्षनेतृत्वांकडे लॉबिंग सुरू केल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर दुसरीकडे महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजू पाटील नवघरे यांचीही उमेदवारी निश्चित असून त्यांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. वसमत विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होणार असली तरी दोन्ही आघाड्यांच्या मित्र पक्षातील अनेकांनी विधानसभा निवडणुकीची तयारी केल्याने बंडखोरीची भीती व्यक्त होत आहे.

महाविकास आघाडीकडून दांडेगावकर यांची उमेदवारी निश्चित असली तरी काँग्रेसकडून मुनीर पटेल, डॉ. मारोती क्यातमवार, प्रशांत गायकवाड यांनी पक्ष नेतृत्वाकडे उमेदवारी मागितली आहे. तर ठाकरे गटाकडून कन्हैय्या बाहेती यांनी देखील उमेदवारीसाठी जोर लावल्याने महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच दिसून येत आहे. महायुतीमध्ये विद्यमान आमदार राजू पाटील नवघरे यांनी प्रचार सुरू केला असतानाच शिंदे गटाचे तालुकाप्रमुख राजू चापके, माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी निवडणुक लढविण्याचा निश्चय केला आहे. तर भाजपचे मिलिंद यंबल, अंकूश आहेर, उज्ज्वला तांभाळे यांनीही निवडणुकीसाठी कंबर कसल्याने आ. नवघरे यांची डोकेदुखी वाढली आहे. तसेच वंचितकडून देखील तगडा उमेदवार मैदानात येणार असल्याने वसमतची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT