The waters of the Kayadhu will flare up once again
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या कयाधू नदीचे पाणी वळण बोगद्य-ाद्वारे पळविण्याचा घाट सुरू आहे. परिणामी, जिल्ह्यातील शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी पुढे येत असून, कयाधू वाचविण्यासाठी शेतकरी नेते डॉ. रमेश शिंदे यांच्या नेतृत्वात एल्गार पुकारण्यात येणार आहे.
२४ मार्च रोजी जिल्हा प्रशासनामार्फत राज्य सरकारला निवेदन दिले जाणार आहे. तर ७ एप्रिलपासून शेकडो शेतकरी उपोषणाला बसणार आहेत. बोगद्याचे काम प्रत्यक्ष सुरू झाले असतानाही सत्ताधारी लोकप्रतिनिधी मात्र त्यांच्या डोळ्यासमोर हक्काचे पाणी पळविले जात असताना गप्प का बसत आहेत असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.
जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्याऐवजी कयाधू नदीचे पाणी वळण बोगद्याद्वारे पळविण्यात येत आहे. खरबी परिसरातून वळण बोगदा तयार केला जात असून, सध्या खांबाळासह विविध ठिकाणी कामही सुरू झाले आहे. या बोगद्य ाद्वारे कयाधू नदीचे पाणी इसापूर धरणात नेले जाणार असून, ते. पाणी नांदेडला पळविण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांतून होत आहे. खांबाळा येथे रेल्वे पटरीलगत सुरू असलेल्या या बोगद्यामुळे परिसरातील भूजल पातळी १०० ते २०० फुटांपर्यंत खाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यामुळे २५ गावांतील विहिरी व बोअरवेल कोरड्या पडून पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कयाधू नदीतील एकूण पाणीसाठा मर्यादित असून बोगद्याद्वारे पाणी वळविल्यास भविष्यात हिंगोली व सेनगाव तालुक्यातील बंधारे, बॅरेजेस व तलाबांसाठी पाणी उपलब्ध राहणार नाही.
तसेच नदीखोऱ्यातील अनेक गावांचा पाणीपुरवठा धोक्यात येईल. जमीन संपादन न करता जबरदस्तीने काम सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व शेतकरी बांधवांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी नेते डॉ. रमेश शिंदे यांनी केले आहे.
खरबी येथील बॅरेजेसला विरोध नसून, नदीच्या उगमस्थानापर्यंत १० ते १२ बॅरेजेस मंजूर करून शेतीसाठी पाणी उपलब्ध करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नियमबाह्य पद्धतीने नदी वळविण्याचा आरोप करत हा बोगदा तात्काळ रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
लोकप्रतिनिधी विरोधात शेतकऱ्यांमध्ये संताप
कयाधू नदीचे पाणी इसापूर धरणात वळविण्यास शेतकऱ्यांसह बहुतांश नेत्यांचा अनेकदा आंदोलने झाली. परंतु, विरोध आहे. या निर्णयाविरोधात राज्य शासनाने हे काम पुढे रेटणे सुरूच ठेवले. हिंगोलीचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी या महत्वाच्या प्रश्नावर सभागृहात आवाज उठविणे गरजेचे होते. परंतु, त्यांनी या महत्वाच्या मुद्याकडे दुर्लक्ष केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कयाधूचे पाणी वळविल्यानंतर हिंगोलीचा निम्मा जिल्हा दुष्काळाच्या खायीत लोटल्या जाणार असल्याने हे पाप कसे फेडणार असा सवाल देखील शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.