हट्टा : पीएम. जिल्हा परिषद प्रशाला हट्टा या शाळेत गेल्या अनेक दिवसांपासून राजपत्रित मुख्याध्यापकाचे पद रिक्त असून विविध विषयांचे शिक्षक अपुरे आहेत. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहात आहे व त्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.
संच मान्यतानुसार माध्यमिकसाठी पाच पदांची मान्यता असून कार्यरत 03 शिक्षक आहेत. दोन पदे रिक्त आहेत व एक क्रीडा शिक्षक मागील अनेक वर्षापासून नाही माध्यमिक साठी इंग्रजी विषय मागील एक महिन्यापासून बंद झालेला आहे. शाळेत वर्गनिहाय व विषयनिहाय शिक्षकांची कमतरता असल्याने अनेक तास रिकामे जातात. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याऐवजी त्यांचे मौल्यवान शैक्षणिक तास वाया जात आहेत. या परिस्थितीमुळे पालक व ग्रामस्थ संतप्त असून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गावकरी व पालकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन शाळेत तातडीने राजपत्रित मुख्याध्यापकाची नेमणूक करावी. तसेच अपुरे शिक्षक भरती करून शाळेला उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात जाईल व यापुढे पालक व ग्रामस्थ एकत्र येऊन आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे. निवेदनावर गंगुबाई रिठे, देविदास लोंढे बाबुराव गवळी, सुरेश सावंत, शाम रोकडे, गजानन पवार, उत्तम खाडे. गौतम खाडे, गजानन देशमुख, महेबूब पठाण, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.