औंढा नागनाथ : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत तालुक्यातील सिध्देश्वर येथे दहा वर्षांपूर्वी बांधकाम पूर्ण झालेली प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत लोकार्पण अभावी धूळखात पडली आहे. कोव्हिड काळात काही महिने वापरात आणल्या नंतर आरोग्य विभागाने त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. परिणामी लाखो रुपयांची वैद्यकीय उपकरणे निकामी होऊन अस्ताव्यस्त पडली असून रुग्णाच्या बेड व इतर अनेक साहित्य चोरीला गेले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत २०१५-१६ मध्ये औंढा नागनाथ तालुक्यातील सिध्देश्वर गावापासून एक किलो मीटरच्या अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व वैद्यकीय उपकरणांनी युक्त असे इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले, इमारती मध्ये प्रसूती गृह, शस्त्रक्रिया विभाग, अंतररुग्ण विभाग, समुपदेशन विभाग यासह विविध सुविधा असलेले सुसज्ज कक्षाची निर्मिती करण्यात आली तसेच शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या उपकरणासह आधुनिक बेड, ऑक्सीजन सिलेंडर, व्हेंटिलेटर अशी विविध मौल्यवान वैद्यकीय उपकरणे आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आली. आता लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण होऊन डोंगराळ भागात असलेल्या सिध्देश्वर परिसरातील २५ ते ३० गावांच्या हजारो ग्रामीण नागरिकांना हाकेच्या अंतरावर आरोग्य सुविधा मिळणार अशी शास्वती होती.
परंतु वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांअभावी सर्व सुविधायुक्त प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पणाला १० वर्षानंतर ही मुहूर्त भेटलेला नाही. मध्यंतरी कोव्हीड काळात काही महिन्यासाठी सदर आरोग्य केंद्र कोव्हीड सेंटरच्या नावाखाली कार्यान्वित करण्यात आले होते. यादरम्यान कोविड रुग्णांसाठी आवश्यक असणारे ऑक्सीजन सिलेंडर, व्हेंटिलेटर यासारखे अनेक प्रकारची लाखो रुपयांची नवीन उपकरणे खरेदी करून याठिकाणी स्थापित करण्यात आली. तसेच त्याकाळात मोठ्या प्रमाणात औषधी साठाही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला. परंतु कोविड संक्रमण ओसरताच वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी निघून गेले आणि सदर प्राथमिक आरोग्य केंद्र बंद पडले.
त्यानंतर या इमारतीकडे आरोग्य विभागाने ढुंकूनही पाहिले नाही. दरम्यानच्या काळात कोणतीही देखभाल नसल्याने इमारतीचे दारे खिडक्या मोडकळीस आल्या असून मौल्यवान वैद्यकीय उपकरणे, बेड धूळखात पडली असून अनेक वस्तू चोरीला गेल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली औंढा नागनाथ तालुक्यातील सिध्देश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धूळखात पडली असून जिल्हा प्रशासन कधी दखल घेणार अशी विचारणा ग्रामस्थांमधून होत आहे.