Setback for Thackeray's Shiv Sena in Hingoli
हिंगोली : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार संतोष टारफे आणि जिल्हाप्रमुख गोपू पाटील यांच्यासह अनेक जिल्हा परिषद सदस्य, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी बुधवारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. आमदार संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व पदाधिकारी शिवसेनेत दाखल झाले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.
पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात सर्व नेत्यांचे स्वागत करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, बुधवारी हिंगोलीतून संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पदाधिकारी शिवसेनेत दाखल झाले आहेत, मी त्यांचे मनापासून स्वागत करतो. संतोष टारफे हे आदिवासी समाजाचे नेते म्हणून उत्तम काम करत आहेत.
त्यांनी २० हजार पेक्षा जास्त मते घेतली होती. आता तुम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत आला आहात, हिंगोली आणि परिसराच्या विकासाबाबत ग्वाही देताना शिंदे म्हणाले, आपल्याला विकासाची घोडदौड जोरात करायची आहे.
विकास प्रकल्प असतील किंवा काही अर्धवट राहिलेली कामे असतील, ती आपण पूर्ण करू. संतोष बांगर यांच्याकडे आपण भरपूर निधी दिला आहे. आता आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी आणि त्या भागाच्या विकासासाठी जे जे आवश्यक असेल, त्यासाठी शिवसेना कायम तुमच्या पाठीशी उभी राहील.
संघर्ष करण्याची क्षमता नसल्याने पक्ष सोडला : देशमुख
पक्ष सोडणारे दोघेही अस्वस्थ होते. त्यांना कामे घ्यायची होती त्यांना गुत्तेदारी करायची होती त्यासाठी ते पक्ष सोडणार याची यापुर्वीच कल्पना होती. त्या संदर्भात आम्ही पक्ष नेतृत्वाला माहिती देखील दिली होती. खरेतर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पक्ष सोडला त्यावेळीच हे दोघेही पक्ष सोडतील हे स्पष्ट दिसू लागले होते. मात्र हिंगोली जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पक्षातील एक दोन पदाधिकारी गेल्याने पक्षाला काहीही फरक पडणार नाही. या उलट शिवसैनिक मोठ्या ताकदीने पक्षाचे काम करतील असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी व्यक्त केला.