हिंगोली

Hingoli crime | सेनगाव पोलिसांची मोठी कारवाई; ५ लाख ३० हजारांचा अवैध गुटखा जप्त

या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पुढारी वृत्तसेवा

सेनगाव: तालुक्यातील छुप्या मार्गाने होणाऱ्या अवैध गुटखा तस्करीवर सेनगाव पोलिसांनी सर्जिकल स्ट्राईक केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ५ लाख ३० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या 'मिशन फत्ते'ची सध्या जिल्हाभरात चर्चा होत आहे.

जिल्ह्यात अवैध धंदे पूर्णतः बंद करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगाव पोलीस सतर्क झाले होते.

तालुक्यात एका चारचाकी वाहनातून चोरट्या मार्गाने गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांना मिळाली. या माहितीच्या आधारे, १ एप्रिल रोजी रात्री ११:२० वाजेच्या सुमारास पोलिसांनी रिसोड–सेनगाव मार्गावरील एका हॉटेलजवळ सापळा रचला. संशयास्पद कार अडवून तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा मिळून आला.

जप्त केलेला मुद्देमाल

पोलिसांनी या कारवाईत प्रतिबंधित गुटखा: १ लाख ७० हजार ४०० रुपये, चारचाकी कार व मोबाईल: ३ लाख ६० हजार रुपये, एकूण किंमत: ५ लाख ३० हजार ४०० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपींवर गुन्हा दाखल

या प्रकरणी २ एप्रिल २०२६ रोजी पहाटे १२:२१ वाजता सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. जिंतूर तालुक्यातील भोगावा देवी येथील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही यशस्वी कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांच्या नेतृत्वाखाली पोलीस शिपाई गजानन सरकटे, राम मारकळ, पी.सी. डांगे, संतोष जाधव, चालक क्षीरसागर आणि नामदेव जाधव यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT