हिंगोली नगरपरिषद निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मतदान केंद्रात एका महिला मतदाराला कोणत्या उमेदवाराला मतदान करावे हे थेट सांगत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता आणि मतदान केंद्रातील कायद्याचे पालन यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मतदान केंद्रात कोणताही राजकीय नेता मतदारांवर प्रभाव टाकू शकत नाही, अशी स्पष्ट नियमावली आहे. मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसवत आमदार बांगर यांनी मतदान केंद्रातच मतदाराला मार्गदर्शन केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसने या प्रकरणी तात्काळ कारवाईची मागणी केली असून, मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी यावर काहीही हरकत न घेता शांत बसल्याने प्रशासनावरही निष्क्रियतेचा आरोप होत आहे. सामोर आलेल्या व्हिडिओत महिला मतदार मतपेटीकडे जात असताना आमदार बांगर तिला कुठे मतदान करायचे हे सांगताना दिसतात.
मतदान केंद्रात प्रवेश फक्त ठरावीक अधिकृत व्यक्तींनाच दिला जातो. शिवाय, मतदारांवर कोणताही दबाव येऊ नये म्हणून निवडणूक आयोगाकडून कडक नियम लागू केलेले असतात. पण या घटनेत नियमांकडे दुर्लक्ष करून केंद्रातच राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या प्रकरणानंतर जनतेतही नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेसोबत आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात आमदार बांगर मतदान केंद्राजवळ कार्यकर्त्यांसह घोषणाबाजी करताना दिसत आहेत. मतदान केंद्राच्या परिसरात प्रचार, घोषणा किंवा मतदारांना प्रभावित करणारी कृती करण्यास निवडणूक आयोगाने पूर्ण मनाई केली आहे.
परंतु या सर्व नियमांचा भंग सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मतदारांकडूनही प्रश्न उपस्थित केला जात आहे की, “सामान्य नागरिकांनी नियम मोडले तर कारवाई होते मग नेत्यांना मुभा का?”
या प्रकरणानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी तात्काळ गुन्हा दाखल करून बांगर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
त्यांचे म्हणणे आहे
“मतदान केंद्रावर सत्ताधाऱ्यांचा बिनधास्त वावर सुरू आहे. नियम फक्त विरोधकांसाठीच लागू आहेत का? निवडणूक प्रक्रियेची पायमल्ली होत आहे.”
विरोधकांचा आरोप आहे की शिंदे-भाजप सरकार सत्ता आणि प्रशासनाचा वापर करून थेट निवडणूक प्रक्रियेवर दबाव आणत आहे.
मतदारांना धमक्या देणे, प्रभाव टाकणे आणि कुठे मतदान करावे सांगणे ही लोकशाहीला धक्का देणारी उदाहरणे असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
दरम्यान, शिंदे गटाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र त्यांच्या समर्थकांनी हा सर्व प्रकार राजकीय नाट्य असल्याचा आरोप केला आहे.