Online transfers of 1131 teachers allowed
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यांतर्गत ऑनलाईन बदली झालेल्या ११३१ शिक्षकांच्या कार्यमुक्तीचे आदेश अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांनी गुरुवारी काढले आहेत. या शिक्षकांना तातडीने नवीन शाळेवर रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे ८७० प्राथमिक शाळा असून या ठिकाणी सुमारे तीन हजारांपेक्षा अधिक शिक्षक कार्यरत आहेत. या शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांसाठी शासनाने विन्सींस या खाजगी कंपनीला कंत्राट दिले होते. त्यानुसार शिक्षकांच्या बदलीसाठी संवर्ग निश्चित करण्यात आले होते.
यामध्ये संवर्ग एक, संवर्ग दोन, संवर्ग तीन, संवर्ग चार व विस्थापित शिक्षकांचा समावेश होता. त्यानुसार त्या त्या संवर्गातून बदली पात्र शिक्षकांनी ऑनलाईन बदलीचे प्रस्ताब दाखल करून त्यामध्ये शाळेचा पसंती क्रमांक देखील दिला होता.
त्यानुसार मागील महिन्यात या शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या झाल्या होत्या. मात्र या बदलीमध्ये काही शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले नाही. त्यानंतर शिक्षकांनी आमदार संतोष बांगर यांच्याकडे धाव घेऊन त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते. त्यानंतर आमदार बांगर यांनी शिक्षणाधिकारी प्रशांत डिग्रसकर यांना शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. दरम्यान, गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या सूच नेनुसार अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांनी ११३१ शिक्षकांच्या कार्यमुक्तीचे आदेश काढले आहेत.
२८ विस्थापित शिक्षकांनाही कार्यमुक्त करण्याचे आदेश काढले असून त्यांना बदली झालेल्या शाळेवर रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कार्यमुक्तीचे आदेश मिळाल्यामुळे शिक्षकांतून समाधान व्यक्त होत असून आता जिल्हयातील बहुतांश शाळांना नवीन गुरुजी मिळणार आहेत.