हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : शहरातील जिजामाता नगर भागातील चौकामध्ये एका व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना शनिवारी रात्री घडली. त्या व्यक्तीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी दोघांवर रविवारी पहाटे हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी एका आरोपीस ताब्यात घेतले असून दुसऱ्याचा शोध सुरु केला आहे.
शहरातील जिजामाता नगरातील प्रकाश सरगड व गजानन वाघमारे हे एकाच गल्लीत राहतात. दोन दिवसांपुर्वी तू मला जोरात का बोलला या कारणावरून गजानन याने प्रकाश यांच्यासोबत वाद घातला होता. शाब्दिक चकमकीनंतर वाद मिटला होता. मात्र गजानन याच्या मनात प्रकाश यांच्याबद्दल राग कायम होता. दरम्यान, शनिवारी सायंकाळच्या सुमारास प्रकाश हे जिजामाता नगर भागातील चौकात उभे होते.
यावेळी दुचाकीवर आलेल्या गजानन व त्याचा मित्र गोलू पुंडगे यांनी पुन्हा एकदा प्रकाश यांच्याशी वाद सुरु केला. त्यानंतर गोलू याने प्रकाश यांचे हात धरले तर गजानन याने बाटलीत आणलेले पेट्रोल प्रकाश यांच्या अंगावर ओतून पेटवून दिले अन घटनास्थळावरून पळ काढला. अचानक झालेल्या या घटनेमुळे प्रकाश घाबरून गेले. प्रसंगावधान राखत प्रकाश यांनी त्यांच्या गळ्यातील रुमाल काढून फेकून दिला.
मात्र यामध्ये त्यांची मान भाजल्या गेली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संदीप मोदे, उपनिरीक्षक राहुल महिपाळे, जमादार अशोक धामणे, शेख मुजीव, संजय मार्के, संतोष करे, गणेश लेकुळे, गणेश वाबळे, शंकर ठोंबरे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमी प्रकाश यांना उपचारासाठी शासकिय रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणी प्रकाश यांच्या तक्रारीवरून गजानन व गोलू यांच्या विरुध्द जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ' पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली. यामध्ये गजानन हा माळधामणी येथे त्याच्या नातेवाईकांकडे लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे जाऊन त्याला अटक केली आहे. तर गोलू याचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.