One person killed in speeding car crash
हिंगोली , पुढारी वृत्तसेवा : हिंगोली ते परभणी मार्गावर जवळा बाजार शिवारामध्ये भरधाव कारच्या धडकेमध्ये एक जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहनाने एका टीनशेडला धडक दिली. त्यानंतर चालकाने कार सोडून पळ काढला.
जवळा बाजार शिवारामध्ये शुक्रवारी रात्री नऊ वाजता एका एजन्सी समोर स्कॉर्पिओ वाहन चालकाने त्याचे वाहन भरधाव वेगाने चालवले. यावेळी वाहन चालकाने पायी जाणार्या एका व्यक्तीला जोरदार धडक दिली. या अपघातात सदर व्यक्ती गंभीर जखमी झाला. त्यानंतर कारचालक घाबरला. त्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामध्ये त्यांनी रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका टीन पत्राच्या शेडला धडक दिली.
यामध्ये शेडचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या अपघाताची माहिती मिळताच जवळा बाजार पोलीस चौकीचे कैलास भगत, इम्रान सिद्दिकी व दिलीप नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी जखमीला तातडीने उपचारासाठी जवळाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी केल्यानंतर सदर व्यक्तीचा मृत्यू झाल्याची जाहीर केले. दरम्यान या अपघातातील मयत व्यक्तीचे नाव भगवान जांबुदे असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. भगवान हे जवळाबाजार येथे शिलाई काम करत होते. रात्रीच्या वेळी काम आटोपून ते पायी असोला फाट्याकडे निघाले असताना पोलीसांनी चालकाचा शोध सुरू केला आहे.