हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ  Pudhari Photo
हिंगोली

Narhari Zirwal : पक्षश्रेष्ठींवर रूसवा, हिंगोलीकरांवर राग; पालकमंत्री झिरवाळांचा ध्वजारोहणासाठी केवळ दीड तासांचा 'दौरा'

फक्त ध्वजारोहणासाठी हिंगोलीत, मुक्काम नांदेडला; पालकमंत्री झिरवाळांच्या दौऱ्याने नवा वाद

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली ः राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांची पक्षश्रेष्ठींवरील नाराजी अद्यापही दूर झाली नसल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी पार पडणार्‍या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणासाठी पालकमंत्री म्हणून झिरवाळ हे केवळ दिड तासांसाठी हिंगोलीच्या दौर्‍यावर येणार आहेत. या दौर्‍यात ते नियोजन समितीची बैठक देखील घेणार नाहीत. पक्षश्रेष्ठींचा राग हिंगोलीतील जनतेवर काढून झिरवाळांना नेमके काय सिद्ध करायचे आहे हा प्रश्‍न मात्र उपस्थित होतो आहे.

हिंगोली सारख्या मागास जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिल्यामुळे पालकमंत्री झिरवळ यांनी हिंगोलीच्या पहिल्याच दौर्‍यात नाराजी व्यक्त केली. गरीब जिल्ह्याचे पालकत्व दिल्यावरून त्यांनी उघड नाराजी व्यक्त केल्याने टिका होऊ लागल्याने त्यांनी आपल्या वक्तव्यावर सारवा सारव केली. त्यानंतर त्यांनी हिंगोली जिल्ह्याच्या दौर्‍यावर येणे टाळले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौर्‍याच्या वेळी त्यांनी पालकमंत्री असतांनाही हिंगोली येथे टाळून आपली उघड नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यातील महत्वाच्या प्रश्नांकडे त्यांचे दुर्लक्ष होऊ लागले आहे.

टंचाईच्या काळात त्यांनी एकदाही जिल्हयात येऊन पाहणी केली नाही तर इतर प्रश्नांवरही अधिकार्‍यांची बैठक घेऊन त्यावर शासनदरबारी पाठपुरावा करण्याची तसदीही घेतली नाही. विशेष म्हणजे जिल्हा नियोजन समितीची 28 मे रोजी त्यांनी ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीचे इतिवृ्त्त स्वाक्षरी करण्यासाठी त्यांनी नाशीक येथेच मागवून घेतले. त्यानंतर मंजूर कामांची यादीही प्रशासनाकडे ऑनलाईन पाठवली.

आता 15 ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक होईल या उद्देशाने प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. मात्र पालकमंत्री झिरवळ यांनी त्यांचा हिंगोली दौरा अवघ्या दिड तासाचा ठरविला आहे. यामध्ये झिरवळ हे नांदेड येथे मुक्कामी थांबणार असून त्यानंतर ध्वजारोहन करून परत नांदेडला जाणार आहेत. त्यांच्या दौर्‍यात कुठल्याही बैठका नसल्याने अधिकारी देखील सुखावले आहेत. दरम्यान, आता पालकमंत्र्यांची नाराजी कधी दूर होणार अन जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नांना गती कधी मिळणार याची प्रतिक्षा नागरीकांना लागली आहे. तर हिंगोलीचे पालकमंत्री नांदेडला मुक्कामी थांबून काय करणार असा सवालही उपस्थित केला जाऊ लागला आहे.

असा असेल पालकमंत्र्यांचा दौरा

पालकमंत्री झिरवळ शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता नांदेड येथील शासकिय विश्रामगृहावरून हिंगोलीकडे निघणार असून सकाळी 8.45 वाजता हिंगोलीत पोहोचतील. त्यानंतर 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून 9.05 वाजता ध्वजारोहन करून सव्वा दहा वाजता नांदेडकडे रवाना होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT