महावितरणला निष्काळजीपणा भोवला; वारसांना ८.५० लाख भरपाई देण्याचे आदेश File Photo
हिंगोली

महावितरणला निष्काळजीपणा भोवला; वारसांना ८.५० लाख भरपाई देण्याचे आदेश

शाळेचे बांधकाम पाहताना विजेच्या धक्क्याने मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

MSEB pays the price for its negligence; ordered to pay ₹8.50 lakh in compensation to the heirs

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा :

शहरातील हनुमान नगर भागात शाळेच्या कामाची पाहणी करताना विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ही घटना महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळेच घडल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हा न्यायालयाने कंपनीला चांगलाच दणका दिला आहे. या प्रकरणी मयताच्या वारसांना ८ लाख ५० हजार रुपये भरपाई आणि ६ टक्के व्याज देण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. सावरकर यांनी दिले आहेत.

शिवाजी जऊळकर (रा. पिंपळखुटा, ता. हिंगोली) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. घरातील कर्त्या व्यक्तीचा महावितरणच्या चुकीमुळे मृत्यू झाल्याने जऊळकर यांच्या वारसांनी अॅड. सुरेश गडदे यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली आणि भरपाईसाठी दावा दाखल केला. सुनावणीदरम्यान अॅड. गडदे यांनी महावितरणच्या गलथान कारभारामुळेच हा अपघात घडल्याचे पुराव्यानिशी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने महावितरणचा निष्काळजीपणा ग्राह्य धरला. त्यानुसार, मयत जऊळकर यांच्या वारसांना ८ लाख ५० हजार रुपये आणि दावा दाखल केल्यापासूनची रक्कम ६ टक्के व्याजासह अदा करण्याचे आदेश दिले आहेत.

४ ऑक्टोबर २०१९ रोजी जऊळकर हे हिंगोलीतील हनुमान नगर भागात सुरू असलेल्या एका शाळेच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. तेथे खोदकाम केलेल्या खड्याची पाहणी करत असताना त्यांचा स्पर्श बाजूलाच असलेल्या महावितरणच्या वीज खांबाला झाला. खांबात विद्युत प्रवाह उतरलेला असल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT