Hingoli Earthquake : गढाळा येथे सौम्य भूकंपाचा धक्का; कोणतीही हानी नाही  File Photo
हिंगोली

Hingoli Earthquake : वसमतसह हिंगोली-नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के, नागरिकांमध्ये घबराट

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा परिसरात आज सकाळी सौम्य धक्का जाणवला.

पुढारी वृत्तसेवा

Hingoli Earthquake : Mild earthquake tremors in Hingoli-Nanded district along with Vasmat, panic among citizens

वसमत / खदीर अहेमद वसमत शहरासह संपूर्ण तालुक्यात शनिवारी सकाळी सुमारे 9.43 ते 9.44 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. काही सेकंद जमिनीला कंप जाणवल्याने नागरिकांमध्ये क्षणिक घबराट निर्माण झाली. अनेक नागरिक घराबाहेर पडल्याचे दिसून आले. प्राथमिक माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, वसमत परिसरासह नांदेड जिल्ह्यातील काही भागांतही हे धक्के जाणवले.

प्राथमिक भूकंप नोंदीनुसार या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे-बोल्डा परिसरात असल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपाची खोली सुमारे 5 किलोमीटर असल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात मध्यम स्वरूपाचे कंप जाणवले.

भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांनी सोशल मीडियावर तसेच दूरध्वनीद्वारे एकमेकांशी संपर्क साधून माहितीची देवाणघेवाण केली. काही ठिकाणी घरातील पंखे, खिडक्या व इतर वस्तूंमध्ये हलकासा कंप जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती प्राप्त झालेली नाही.

दरम्यान, महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून अधिकृत अहवालाची प्रतीक्षा आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

भूकंपाचा धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, भूकंपाचे धक्के जाणवल्यास तत्काळ सुरक्षितरीत्या घराबाहेर पडून मोकळ्या जागेत थांबावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नसून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जाऊ नये आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT