हिंगोली : महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जातीचे अ.ब.क.ड. नुसार उपवर्गीकरण करून त्याची तात्काळ घोषणा करण्यात यावी या मागणीसाठी मंगळवारी सकल मातंग समाजाच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. शहराच्या मुख्य मार्गावरून शिस्तबद्ध आणि तितक्याच आक्रमकपणे काढण्यात आलेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता.
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन पाठविण्यात आले. यावेळी मातंग समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाकडून उपवर्गीकरण करताना लोकसंख्या किंवा जातवार महामंडळांचा आधार घेतला जात असल्याची माहिती समोर येत आहे. तथापि, असा आधार सर्वोच्च न्यायालयाच्या निकषांशी विसंगत असून, तो घटनात्मक तत्त्वांना धरून नाही. त्यामुळे केवळ लोकसंख्येचा आधार न घेता अंतर्गत मागासलेपणा आणि अपुरे प्रतिनिधित्व या निकषांवरच तात्काळ उपवर्गीकरणाची घोषणा करावी, अशी आग्रही मागणी सकल मातंग समाजाच्या वतीने या मोर्चाद्वारे करण्यात आली.