कळमनुरी : कळमनुरी पोलीस ठाणे अंतर्गत एका विवाहित महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या तरुणावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.12) रोजी सदर महिलेच्या तक्रारीवरून रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आता आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली असल्याचे पोलिसांकडून समजले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी पोलीस ठाणे अंतर्गत एका ठिकाणी राहणाऱ्या महिलेचा तिच्या पतीसोबत वाद झाल्यामुळे सदर महिला पतीपासून वेगळी राहत होती. त्या विवाहित महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत सलमान पठाण साहेब खान पठाण (रा. कळमनुरी) या तरुणाने त्या महिलेला विवाहाचे अमिष दाखवून तिच्यावर अनेक वेळा अत्याच्यार केला. मागील एका वर्षापासून हा प्रकार सुरू होता.
दरम्यान, त्या महिलेने मागील काही दिवसापासून लग्नाचा तगादा लावला मात्र, सलमान हा तीच्या सोबत लग्न करण्यास टाळाटाळ करू लागला. महिलेने लग्नाचा विषय काढल्यानंतर सलमान यांने त्या महिलेस मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने थेट औंढा नागनाथ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून औंढा नागनाथ पोलिसांनी सलमान पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जी. एस. राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेड पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दुस हे करीत आहेत.