आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील चिखली येथील प्रवीण दादाराव चव्हाण (वय 34) या तरुणाने मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे शासनाने मागे घेतले नसल्याच्या कारणावरून व आरक्षण मिळण्यात होणाऱ्या विलंबामुळे विष प्राशन करून जीवन संपवले. ही घटना 26 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता घडली.
प्रवीण चव्हाण हा मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभागी होता. आंदोलनाच्या वेळी त्याच्यावर गुन्हे दाखल झाले होते. ते शासनाने मागे घेतले नाहीत यामुळे तो मानसिक तणावाखाली होता. त्यामुळे चिखली शिवारातील शेतातील शेडमध्ये त्याने विषारी औषध प्राशन करून जीवन यात्रा संपवली.
या घटनेबाबत अनिल शिवाजी चव्हाण यांच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात 29 सप्टेंबर रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठे, जमादार शिवाजी पवार आणि जोगदंड यांनी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास जमादार शेख बाबर करीत आहेत.