हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाने सर्व पक्षांना, नेत्यांना मोठे केले आहे. मात्र आता समाजाला द्यायची वेळ आल्यावर नकार का दिला जातोय, असा सवाल मराठा आरक्षणाचा लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यास विरोध करणाऱ्या छगन भुजबळ यांना बळ देण्याचे काम करू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
ते पत्रपरिषदेत बोलत होते. ते म्हणाले, मंत्री छगन भुजबळ मोठे नेते आहेत. त्यांना मोठे करण्यामध्ये मराठा समाजाचाही वाटा
आहे. मात्र त्यांनी मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाला विरोध करणे चुकीचे आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन समाजात द्वेष निर्माण होईल असे बोलू नये.. ओबीसी समाजाच्या हक्कावर गदा न येता मराठा समाजाला कसा न्याय देता येईल, हे बघितले पाहिजे. अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केल्यानंतर उपोषण सोडण्यासाठी सरकारने अनेक डाव टाकले होते. मात्र त्यांचे सर्व डाव उधळून लावले. सरसकट मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे. अर्धवट आरक्षण आम्हाला मान्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.