जवळाबाजार, पुढारी वृत्तसेवा : येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात सकल जैन समाजाच्या वतीने भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव साजरा केला जात आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ९ व १० एप्रिल रोजी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या दिवशी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
नुकतीच या महोत्सवाच्या अनुषंगाने मंदिरात एक नियोजन बैठक पार पडली. ९ एप्रिल रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत भगवान महावीर यांचा अभिषेक व पूजन, ८ ते ९ सामूहिक नमोकार मंत्र जप, तर १० ते ३ या वेळेत संगीतमय कल्याण मंदिर विधानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पंडित विलासजी महाजन हरळ व संगीतकार शिखरचंद जैन (शिरडशहापुर) यांच्या सान्निध्यात संपन्न होणार आहे.
१० एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता भगवान महावीर यांचा अभिषेक होईल. त्यानंतर सकाळी ८ वाजता मंदिरापासून भगवान महावीर यांच्या प्रतिमेची शोभायात्रा सुरु होईल. ही मिरवणूक गावातील मुख्य रस्त्यांवरून पोलीस चौकी, बसस्थानक, साधु महाराज मंदिर मार्गे जैन मंदिरात समारोपास येईल. त्यानंतर महाप्रसाद आणि सायंकाळी आरतीसह धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमात जैन समाज बांधव, सिद्धी गुरुप महिला मंडळ, नवयुवक मंडळ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष यांनी केले आहे.